इराणचे सैफी कुटुंब रंगलंय कबड्डीत

मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कबड्डीमध्ये सर्वोत्तम महिला पंच म्हणून नाव कमवायचे तर आहेच; पण बरोबरीने माझा व्यवसाय सांभाळत एक चांगली आईदेखील मला व्हायचं आहे.
- लैला सैफी

पुणे - लैला सैफी, कबड्डीविश्‍वात सध्या चर्चेत असलेले नाव. इराणसारख्या मुस्लिम देशात राहूनही लैला सैफी या व्यवसायानं इलेक्‍ट्रिक इंजिनिअर असणाऱ्या मुलीने आता कबड्डीला जणू आपले दुसरे घर केले आहे. खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर लैला आता आपला व्यवसाय सांभाळत कबड्डीमधील पंच म्हणून नावारूपाला येत आहे. प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरून आता ती जगभरात पोचली आहे. विशेष म्हणजे केवळ लैलाच नाही, तर तिचं संपूर्ण सैफी कुटुंबच कबड्डीत रंगलंय.

इराणमध्ये ज्या तीन व्यक्तींनी कबड्डीचा पाया रचला, त्यापैकी एक अब्दुल्ला सैफी यांची लैला ही मुलगी. वडिलांचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने समर्थपणे सांभाळला. भाऊ महंमद हा इराणकडून कबड्डी खेळला. त्यानंतर सुरय्या ही मोठी बहीण इराणच्या महिला संघाची प्रशिक्षक, छोटी बहीण महजब हीदेखील कबड्डी पंच म्हणून काम बघते. लैला स्वतः २००५मध्ये आशियाई अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत इराणकडून खेळली. मात्र, खेळाडू म्हणून फारसे यश हाती न लागल्यामुळे लैला आता महिला पंच म्हणून काम करत आहे. इराणमध्ये पुरुष आणि महिला कबड्डीमध्ये पंच म्हणून काम करताना महिलांना फक्त महिलांच्या  सामन्यातच काम पाहता येते. अशा कट्टर परंपरेतून आलेल्या लैलाची विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आणि ती चर्चेचा विषय ठरली. 

लैला म्हणाली, ‘‘वडीलच कबड्डी खेळातील असल्यामुळे लहानपणापासून आमच्या घरातत प्रत्येकाला कबड्डीची आवड होती. भाऊ खेळायचा. पण, मुलींनी कबड्डी खेळण्यासाठी मैदानात उतरायचं म्हणजे खूप कठीण होतं. अर्थात, वडिलांनी कधीच विरोध केला नाही. त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. तरीदेखील इंजिनिअर झाल्यावर माझी खऱ्या अर्थाने कबड्डीची वाटचाल सुरू झाली. आधी खेळाडू आणि आता पंच म्हणून काम करताना मी कबड्डीला दुसरे घरंच केले आहे.’’

केर्मनशाह या इराणच्या एका शहरातून लैला लग्न करून सेनमान या शहरात आली. तरी तिची कबड्डी थांबली नाही. तिचे पतीदेखील इलेक्‍ट्रिक इंजिनिअर आहेत. लैला दोन मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा ९ आणि छोटा ३ वर्षाचा आहे. व्यवसाय, आई अशा व्यापातूनही केवळ कुटुंबाने साथ दिली म्हणून कबड्डीत रमू शकले असे ती सांगते. ती म्हणाली, ‘‘वडिलांनंतर पतीचे खूप मोठे सहकार्य मिळत असल्यामुळे मी कबड्डीत काम करू शकते. तो मुलांची  चांगली काळजी घेतो. आता प्रो-कबड्डीमुळे कुटुंबापासून खूप दिवस दूर आहे. मुलांची आठवण येते. पण, पती असल्यामुळे मी निश्‍चिंत आहे.’’ 

Web Title: sports news Laila Saifi kabaddi