यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा भूगावला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक कार्यक्रमातील प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा पुण्याला सलग दुसऱ्या वर्षी मान मिळाला आहे. फरक इतकाच की या वर्षी हा बहुमान पुणे जिल्हा तालीम संघाला मिळाला असून, या स्पर्धी पुढील महिन्यात मुळशी तालुक्‍यातील भूगाव येथे पार पडतील. गेल्या वर्षी पुणे शहर तालीम संघाला हा मान मिळाला होता.

यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा नगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने शिर्डी येथे पार पडणे अपेक्षित होते. साईबाबा समाधी सोहळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ही स्पर्धा शिर्डीत घेण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात होता. मात्र, त्यांनी ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीत घेण्याची तयारी दाखवली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार परिषदेने यास नकार दिला आणि गेली दोन वर्षे आयोजनाची तयारी दाखवणाऱ्या पुणे जिल्हा तालीम संघाला आयोजनाचा बहुमान दिला.

हा पदाधिकारी म्हणाला, ‘‘पुणे जिल्हा तालीम संघ स्पर्धेच्या आयोजनासाठी आतुर होते. सातत्याने त्यांची मागणी होत होती. मात्र, गेल्या वर्षी पुणे शहराला हा मान मिळाला होता. लगेच पुणे जिल्ह्याला हा मान नको म्हणून आम्ही नगरला पसंती दिली होती. मात्र, त्यांची स्पर्धा फेब्रुवारीत घेण्याची मागणी आम्हाला मान्य नव्हती. राज्य सरकारच्या खाशाबा जाधाव कुस्ती स्पर्धा जानेवारीत मुंबईत होणार आहेत. या स्पर्धेत राज्य कुस्तीगीर अधिवेशनातील सर्वोत्तम आठ संघ खेळतात. त्यामुळे त्यापूर्वी राज्य स्पर्धा होणे अपेक्षित होते. केवळ या एकाच तांत्रिक अडचणीमुळे ही स्पर्धा पुणे जिल्हा तालीम संघाला देण्यात आली.’’ स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहेत.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांची वेळ निश्‍चित झाल्यावर स्पर्धेची अंतिम तारीख नक्की करण्यात येईल असेही हा पदाअधिकारी म्हणाला.

Web Title: sports news maharashtra kesari competition in bhugaon