नदाल, जोकोविचचे विजय

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

पॅरिस - रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने जोरदार खेळासह आगेकूच केली.

पॅरिस - रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने जोरदार खेळासह आगेकूच केली.

नदालने नेदरलॅंड्‌सच्या रॉबिन हासीवर ६-१, ६-४, ६-३ अशी मात केली. जोकोविचनेही आरामात विजय मिळविला. त्याने पोर्तुगालच्या जाओ सौसाला ६-१, ६-४, ६-३ असे पराभूत केले. गतविजेत्या गार्बीन मुगुरुझाने इस्टोनियाच्या ॲनेट काँटावेईट हिचे आव्हान ६-७ (४-७), ६-४, ६-२ असे परतावून लावले. अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सने जोरदार खेळ करीत महिला एकेरीत तिसरी फेरी गाठली. फ्रेंच आव्हानवीर ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाने अपेक्षाभंग केला; तर पेट्रा क्विटोवा पराभूत झाली.  

व्हिनसने जपानच्या कुरुमी नारा हिला ६-३, ६-१ असे हरविले. दहावे मानांकन असलेल्या व्हिनसने बेसलाइनलगत ‘ग्राउंडस्ट्रोक्‍स’ मारताना आपला दर्जा प्रदर्शित केला. त्यामुळे कुरुमीची दमछाक झाली. व्हिनस ३६ वर्षांची आहे. १९८२ मध्ये बिली-जीन किंग यांनी तिसरी फेरी गाठली होती. त्यानंतर या स्पर्धेत अशी कामगिरी केलेली व्हिनस सर्वाधिक वयाची महिला टेनिसपटू ठरली. व्हिनस २०व्या वेळी या स्पर्धेत सहभागी झाली आहे. तिला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही. २००२ मध्ये अंतिम फेरीत ती सेरेनाकडून हरली होती.

क्विटोवा पराभूत
चेक प्रजासत्ताकाची पेट्रा क्विटोवा दुहेरीतील ‘स्पेशालिस्ट’; तसेच ‘नंबर वन’ असलेल्या अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सॅंड्‌स हिच्याकडून दुसऱ्या फेरीत ६-७ (५-७), ६-७ (५-७) असे हरली. चाकूहल्ल्यानंतर पुनरागमन केलेल्या पेट्राकडून आणखी सरस कामगिरीची अपेक्षा होती; पण आघाडी घेतल्यानंतर तिचे सोपे फटके चुकले. बेथानी ३२ वर्षांची आहे. तिने २०१५ मध्ये दुहेरीत जेतेपद मिळविले होते. २-४ अशा पिछाडीनंतर तिने जिद्दीने खेळ केला. तिने फोरहॅंडचे ताकदवान फटके मारत क्विटोवाला नेटजवळ येण्यास भाग पाडले. क्विटोवाचे परतीचे फटके चुकत होते. त्यातच क्विटोकडून नऊ डबल फॉल्ट झाल्या. अखेरच्या गुणाला तिच्याकडून हीच चूक झाली.

त्सोंगाकडून अपेक्षाभंग
सक्षम फ्रेंच टेनिसपटूंमध्ये गणना होणाऱ्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा याने अपेक्षाभंग केला. त्याला पहिल्याच फेरीत अर्जेंटिनाच्या रेन्झो ऑलिव्होने ७-५, ६-४, ६-७ (६-८), ६-४ असे हरविले. त्सोंगाला १२वे मानांकन होते. त्याने क्‍ले कोर्टवरील लिऑन ओपन स्पर्धा जिंकली होती. शेवटी तीन मॅचपॉइंट वाचविल्यानंतर त्याला आणखी झुंज देता आली नाही. रेन्झो ९१व्या स्थानावर आहे. तो म्हणाला की, ‘हॉटेलमध्ये परतलो तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. मी मसाज घेतला. झोप लागत नव्हती. मी प्रत्येक गुण अखेरचा असल्याचे समजून खेळलो.’

बोपण्णा विजयी, सानिया पराभूत
दुहेरीत रोहन बोपण्णाने उरुग्वेच्या पाब्लो क्‍युव्हास याच्या साथीत जोरदार सलामी दिली. त्यांना नववे मानांकन आहे. मथायस बौर्ग्यू आणि पॉल-हेन्री मॅथ्यू या फ्रेंच जोडीला त्यांना ६-१, ६-१ असे किरकोळीत हरविले. सानिया मिर्झाला मात्र कझाकस्तानची नवी जोडीदार यारोस्लावा श्वेडोवा हिच्या साथीत आणखी एक धक्कादायक पराभव पत्करावा लागला. डॅरीया गाव्रीलोवा (ऑस्ट्रेलिया)-अनास्ताशिया पावल्यूचेन्कोवा (रशिया) यांच्याकडून त्या ६-७ (५-७), ६-१, २-६ असे हरल्या.

Web Title: sports news Nadal, Djokovic's victory