खराब कामगिरीची जबाबदारीही घ्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय पथकातील नावे कमी करण्यावरून पुन्हा एकदा केंद्रीय क्रीडा मंत्रालय, क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यात संघर्षाला सुरवात झाली आहे. खेळाबाबत माहिती नसलेले पदाधिकारी हे काम करत असून, यानंतर जर भारताची कामगिरी खराब झाली, तर त्या अपयशाची जबाबदारीदेखील क्रीडा मंत्रालय आणि साई यांनी घ्यावी, असे खडे बोल ‘आयओए’चे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी सुनावले आहेत. 

‘आयओए’ने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाकडे २२२ खेळाडूंसह प्रशिक्षक, व्यवस्थापक अशी एकूण अन्य ९५ नावे संमतीसाठी पाठवली होती. क्रीडा मंत्रलयाने या यादीतून २१ पदाधिकाऱ्यांची नावे काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. यातून काही प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्याही नावांना कात्री लागली आहे.

भारतीय संघाच्या निरोप समारंभात बोलताना बात्रा म्हणाले, ‘‘ज्याला खेळाची आणि नियमांची माहिती नाही, असे अधिकारी संघातून नावे कमी करण्याचे काम करत आहेत. स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असताना आम्हाला अशा समस्येला तोंड द्यावे लागत आहे.’’

व्यवस्थापकांची नावे कापण्यावरून बात्रा यांनी सरिता देवीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘गेल्या आशियाई स्पर्धेतही व्यवस्थापक नसल्यामुळे विरोध दर्शविण्यासाठी सरिताला पत्रकाराकडून उसने पैसे घ्यावे लागले होते, अशी वेळ पुन्हा भारतीय खेळाडूवर येऊ नये. पण, दुर्दैवाने अशी वेळ आल्यास ती जबाबदारी कोण पार पाडणार. सरकारला अशा अडचणींबाबत काहीच माहिती नाही. तर मग ते परस्पर नावे तरी कशी कापू शकतात?’’

जिम्नॅस्टिक प्रशिक्षकास अजून मान्यता नाही
कोलकता ः राष्ट्रकुल स्पर्धा तोंडावर असतानाच जिम्नॅस्टिक संघासाठी नियुक्त प्रशिक्षकांना अजून ‘आयओए’कडून मान्यता नसल्याचे समोर आले आहे. भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाने पुरुष संघासाठी अशोक मिश्रा आणि महिला संघासाठी मिनारा बेगम यांची निवड केली आहे. मात्र, आजच्या दिवसापर्यंत त्यांच्या नावांना ‘आयओए’ने मान्यता दिलेली नाही. अशोक मिश्रा म्हणाले,‘‘मी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जाणार आहे की नाही, हेच मला माहीत नाही. आमचा संघ चांगला आहे; पण प्रशिक्षकाच्या नियुक्तीवरून सरावावर परिणाम होत आहेत.’’

आम्ही संघाबरोबर सर्वोत्तम प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय होईल.
- राजीव मेहता, आयओए सचिव

Web Title: sports news Narendra Batra IOA