समांतर कबड्डी संघटनेची चढाई; राष्ट्रीय स्पर्धा जुलैमध्ये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - देशातील कबड्डीत घराणेशाही असल्याचा आरोप करत भारतात नव्या राष्ट्रीय कबड्डी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या ‘न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ने सध्याच्या भारतीय हौशी कबड्डी महासंघास आव्हान देत राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा केली आहे.

मुंबई - देशातील कबड्डीत घराणेशाही असल्याचा आरोप करत भारतात नव्या राष्ट्रीय कबड्डी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या ‘न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ने सध्याच्या भारतीय हौशी कबड्डी महासंघास आव्हान देत राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा केली आहे.

सध्याच्या महासंघात घराणेशाही आहे. ही संघटना काही सदस्यांची कौटुंबिक मक्तेदारी झाली आहे. केवळ काही राज्यांतील खेळाडूंनाच संधी दिली जात आहे. त्यातही काहींना झुकते माप दिले जात आहे. खेळाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या व्यक्तींकडे खेळाची सूत्रे आहेत. कबड्डीतील गुणवान खेळाडूंना संधी देण्यासाठी आम्ही ‘न्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ची स्थापना केली आहे, असे या संघटनेचे सचिव एम. व्ही. प्रसाद बाबू यांनी सांगितले.

आम्ही माजी कबड्डीपटू खेळाच्या प्रगतीसाठी एकत्र आलो आहोत. यात अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. आमच्या या मोहिमेस सर्व राज्यांतून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही घेत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा सहभाग असेलच; पण त्याचबरोबर राजस्थानचाही संघ येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धा ६ ते ९ जुलैदरम्यान त्रिची येथील आरव्हीएस आर्टस अँड सायन्स कॉलेजमध्ये होणार आहे. या स्पर्धेत ७५० पुरुष तसेच महिला खेळाडू आणि २५० पंच, अधिकारी यांचा सहभाग असेल. या स्पर्धेसाठी अनेक देशांतील सर्व राज्यांचे संघ येणार आहेत, एवढेच नव्हे, तर राजस्थानातील संघही सहभागी होईल, असेही त्यांनी सांगितले. 

आम्ही कबड्डीतील कारभारात जास्त सुसूत्रता आणण्यासाठी तसेच आमच्या भूमिकेचा प्रसार करण्यासाठी पाच विभाग केले आहेत. त्यात पश्‍चिम विभागही आहे. पश्‍चिम विभागात गुजरात, गोवा, महाराष्ट्र, विदर्भ तसेच मध्य प्रदेश आहेत. आम्ही यापूर्वीच भारतीय कबड्डी संघटनेच्या कारभाराविरुद्ध न्यायालयातही गेलो आहोत. त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात अपेक्षित आहे, असेही प्रसाद बाबू यांनी सांगितले.

Web Title: sports news new kabaddi federation of india establishment