प्रो-कबड्डीतील बंगळूरचे सामने नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नागपूर - बंगळुरातील कांतिरावा स्टेडियमच्या व्यवस्थापनाने परवानगी न दिल्याने प्रो-कबड्डी पाचव्या मोसमातील बंगळूर बुल्सचे घरच्या मैदानावरील सामने आता बंगळूरऐवजी नागपुरात होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने कळविले आहे. त्यामुळे संघ नसूनही नागपुरच्या क्रीडा प्रेमींना प्रो-कबड्डीच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. 

नागपूर - बंगळुरातील कांतिरावा स्टेडियमच्या व्यवस्थापनाने परवानगी न दिल्याने प्रो-कबड्डी पाचव्या मोसमातील बंगळूर बुल्सचे घरच्या मैदानावरील सामने आता बंगळूरऐवजी नागपुरात होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने कळविले आहे. त्यामुळे संघ नसूनही नागपुरच्या क्रीडा प्रेमींना प्रो-कबड्डीच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. 

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे हे सामने होतील, असे बंगळूर बुल्स संघ व्यवस्थापनाने कळविले आहे. प्रो-कबड्डी पाचव्या मोसमाला २८ जुलैपासून सुरवात होत असून, कांतिरावा स्टेडियम उपलब्ध नसल्याने स्पर्धा कार्यक्रमात ऐनवेळी बदल करावा लागला आहे. यामुळे आता ४ ते १० ऑगस्ट या कालावधीत बंगळूर येथे होणारे सामने नागपुरात होतील. ‘यंदा बंगळूर संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार नाही, ही घोषणा करताना दुःख होत आहे. आम्हाला कांतिरावा स्टेडियमची आवश्‍यक परवानगी अनेकदा प्रयत्न करूनही मिळाली नाही, या शब्दात डब्ल्यूएल स्पोर्टस लिगचे मुख्य कार्यकारी उदयसिंग वाला यांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरातही आम्हाला पाठीराख्यांचा तितकाच पाठिंबा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, कांतिरावा स्टेडियमची परवानगी न मिळल्याने बंगळुरात होणारे इतर सामनेही नागपुरात होण्याची शक्‍यता आहे. मात्र त्याविषयी निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. 

सारंग, शशांकही खेळणार
बंगळूरचे सामने नागपुरात होत असल्याने नागपूरचे सारंग देशमुख (तामिळ थलाईवास) आणि शशांक वानखेडे (बंगाल) यांचा खेळ पाहण्याची संधीही नागपुरकरांना मिळणार आहे. दिल्ली दबंगचा सामना नसल्याने शुभम पालकरला मात्र खेळताना पाहता येणार नाही. 

बंगळूरचे नागपुरातील सामने 
४ ऑगस्ट - विरुद्ध तमीळ थलाईवास - रात्री ८
५ ऑगस्ट - विरुद्ध यू. पी. योद्धा - रात्री ९ 
६ ऑगस्ट - विरुद्ध पटणा पायरट्‌स - रात्री ९
८ ऑगस्ट - तेलुगू टायटन्स - रात्री ९
९ ऑगस्ट - बंगाल वॉरियर्स - रात्री ८
१० ऑगस्ट - विरुद्ध तमीळ थलाईवास - रात्री ९

Web Title: sports news pro-kabaddi banglur match in nagpur

टॅग्स