मुंबईचे तेलुगूला जीवदान

शैलेश नागवेकर
रविवार, 20 ऑगस्ट 2017

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने जीवदान दिले. राहुल चौधरीच्या चढायांच्या जोरावर तेलुगूने हा सामना ३७-३२ असा जिंकला.

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने जीवदान दिले. राहुल चौधरीच्या चढायांच्या जोरावर तेलुगूने हा सामना ३७-३२ असा जिंकला.

यंदाच्या प्रो-कबड्डीत ‘ब’ गटातील जवळपास प्रत्येक संघाने तेलुगूला पराभूत केले आहे, पण इंटर झोन साखळीत त्यांनी ‘अ’ गटात तळ्यातमळ्यात कामगिरी करत असलेल्या यू मुम्बाला लक्ष्य केले. राहुल चौधरीच्या दोन सुपर चढाया आणि त्यांच्या बचावपटूंनी अनुप कुमार आणि शब्बीर बापू यांच्या केलेल्या सुपर कॅच सामन्याचा निकाल स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. तरीही अखेरच्या क्षणी बरोबरी साधलेल्या मुंबईला बाजी पलटवण्याची संधी होती; परंतु दोन मिनिटे असताना मुंबईवर लोण पडला आणि त्यांचा खेळ खल्लास झाला.

या सामन्यातही मुंबईची सुरवात अडखळती होती. दहाव्या मिनिटालाच त्यांना लोणचा सामना करावा लागला, तरीही गुणफलक ८-१२ असा होता. अशीच चुरस कायम असताना शब्बीर बापू सुपर कॅच झाला आणि मध्यांतराचा गुणफलक १५-१९ असा झाला. मध्यांतरानंतर अनुप कुमार कॅचचा शिकार झाला, तरीही काही वेळेत मुंबईने तेलुगूवर लोण दिला आणि बरोबरी साधली; परंतु त्याचे रूपांतर त्यांना विजयात करता आले नाही. या सामन्यात पूर्वाश्रमीचा मुंबईचा; परंतु यंदा तेलुगूतून खेळणारा राकेश कुमार दुखापतीमुळे खेळू शकला नाही, परंतु त्याच्या ठिकाणी संधी देण्यात आलेल्या सोमबीरने सुपर कॅच केल्या.

यूपीचा दुसरा पराभव
यूपी योद्धाला घरच्या मैदानावरील टप्प्यात सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. सामन्यातील बहुतांश वेळ पिछाडीवर असलेल्या हरियाना संघाने निर्णायक क्षणी बाजी पलटवली आणि ३६-२९ असा सामना जिंकला. विकास कंडोलाच्या चढाया आणि सुरेंद्र नाडा व मोहित चिल्लर यांच्या पकडी हरियानासाठी मौल्यवान ठरल्या.

Web Title: sports news pro-kabaddi competition