एलावेनिलचा सलामीला दोन सुवर्णपदकांचा वेध

एलावेनिलचा सलामीला दोन सुवर्णपदकांचा वेध

मुंबई - राष्ट्रीय निवड चाचणीत विश्‍वविक्रमी गुणांचा वेध घेतलेल्या एलावेनिल वालारिवान हिने विश्‍वकरंडक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतास दोन सुवर्णपदके जिंकून दिली. एलावेनिलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक कुमार स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. एलावेनिलने एका गुणाने तैवानच्या प्रतिस्पर्धीस मागे टाकत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या स्पर्धेत भारतास अर्जुन बाबुता याच्या ब्राँझवरच समाधान मानावे लागले. 

सिडनीत सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरातच्या एलावेनिलने श्रेया अगरवाल आणि झीना खिट्टा यांच्या साथीत सांघिक सुवर्णपदक जिंकले. या तिघींनीही अंतिम फेरी गाठली. एलावेनिल हिने अंतिम फेरीत २४९.८ गुणांचा वेध घेताना तैवानच्या लिन यिंग शिन हिला १.१ गुणांनी मागे टाकले. श्रेया (१६४.८) सहावी; तर झीना (१४४.१) सातवी आली. एलावेनिल (६३१.४), झीना (६२३.१) आणि श्रेया (६२२) यांनी भारतास १८७६.५ गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी तैवान (१८६९.२) आणि चीन (१८६८.३) यांना मागे टाकले. 

गतवर्षीच्या जागतिक स्पर्धेत २८ वी आलेल्या एलावेनिलने पात्रतेत जागतिक कुमार विक्रमाची बरोबरी साधत सर्वांना धक्का दिला. अखेरच्या २४ व्या शॉटस्‌ला तिने १०.७ गुणांचा वेध घेत सुवर्णपदक निश्‍चित केले. त्यापूर्वीचा शॉट ९.६ गुणांचा होता. त्यामुळे तिच्यावर दडपण होते; पण तिने कमालीची अचूकता दाखवली. 

अन्‌ दुरावणारे यशही
     मुलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत तिघे अंतिम फेरीत; पण पदक एकच.
     पात्रतेत अर्जुन तिसरा, शाहू माने सहावा; तर सूर्या प्रताप सिंग सातवा.
     अर्जुनने (१६१.७) दोन वर्षांपूर्वीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेप्रमाणे ब्राँझ जिंकले.
     अंतिम फेरीत शाहू (१६१.७) सहावा; तर सूर्या (११९.४) आठवा.
     सौम्या गुप्ताने मुलींच्या ट्रॅपची अंतिम फेरी गाठली; पण अखेर पाचवी.
     सौम्या १०१ गुणांसह पात्रतेत सहावी.
     पदक क्रमवारीत भारत (२ सुवर्ण, एक ब्राँझ) चीनपाठोपाठ (३ सुवर्ण, ३ ब्राँझ) दुसरा. 

एलावेनिलची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही विश्‍वकरंडक स्पर्धा होती. त्यात सुवर्णपदक जिंकल्यामुळे ती खूश आहे; पण ही केवळ सुरवातच आहे, असेच ती सांगते. ऑलिंपिक पदक जिंकलो तरच आपण काही साध्य केले आणि गुणवत्तेस न्याय दिला, असेच तिच्यासह अनेक युवा नेमबाजांचे मत आहे.
- दीपाली देशपांडे, भारतीय मार्गदर्शिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com