सुपरक्रॉसमध्ये जोकर लेनचे आव्हान पेलत नोहचे वर्चस्व

सुपरक्रॉसमध्ये जोकर लेनचे आव्हान पेलत नोहचे वर्चस्व

कोईमतूर - टीव्हीएस रेसिंगच्या हरित नोह याने एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेच्या दुसऱ्या फेरीत जोकर लेनचे आव्हान पेलत वर्चस्व राखले. एक्‍स्पर्ट गटात त्याने दोन्ही मोटो जिंकले. याबरोबरच त्याने गुणतक्‍त्यातील आघाडी वाढविली.

कोडेसिया येथील जेनीज क्‍लबच्या आव्हानात्मक ट्रॅकवर ही फेरी रविवारी पार पडली. हरितने अडखळत्या सुरवातीनंतर अंतिम टप्प्यात मुसंडी मारली. टीव्हीएस आरटीआर२५० बाईक चालविताना त्याने त्रिचूरचा खासगी स्पर्धक सी. डी. जीनन याचे आव्हान परतावून लावले. टीव्हीएसच्या ऋग्वेद बारगुजेला तिसरा क्रमांक मिळविला. तो दोन मोटोंमध्ये अनुक्रमे तिसरा व चौथा आला. हरितने ४०, तर कावासाकी केएक्‍स२५०एफ चालविणाऱ्या जीननने ३४ गुण मिळविले. ऋग्वेद पुण्यात सराव करताना बाईकवरून पडला होता. त्यामुळे त्याची सुरवात संथ होती. यातून सावरत त्याने तिसरा क्रमांक मिळविला, पण तो नेहमीसारखा वेग राखू शकला नाही.

मालिकेचे प्रवर्तक असलेल्या गॉडस्पीड रेसिंगचे संचालक श्‍याम कोठारी यांनी सांगितले की, जोकर लेनच्या प्रयोगाचे बहुसंख्य रायडर्सनी स्वागत केले. यातील काही जणांना अवघड अडथळे सफाईने पार करता आले नाहीत. यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला, पण एकूण प्रतिसाद उत्साहवर्धक होता. भारतात प्रथमच आम्ही हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला. रायडर्सना याची कल्पना नसल्यामुळे प्रत्येक फेरीत रंगत कायम राहिली. इतर फेऱ्यांमध्येसुद्धा जोकर लेन असावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. फॉर्म्युला वनमध्ये पीटमध्ये स्पर्धक जातात. येथे रायडरना एकूण फेऱ्यांदरम्यान जोकर लेन केव्हा पार करायची, हे ठरविण्याची मुभा होती.

जोकर लेनचे गूढ असल्यामुळे रायडर्सकडून वेगवेगळा प्रतिसाद मिळाला. काही जणांनी सुरवातीलाच जोकर लेन पार केली, तर काही जणांनी अखेरच्या टप्प्यात हे केले. काही रायडर्स मात्र जोकर लेन पार करायचेच विसरले. यामुळे त्यांना बाद व्हावे लागले. यात कोईमतूरचा नवोदीत गटातील रायडर असरुद्दीन याचा समावेश होता. व्ही. एम. महेशला मागे टाकत त्याने पहिला क्रमांक मिळविला होता, पण जोकर लेन पार करायचे विसरल्यामुळे तो बाद ठरला.

प्रमुख निकाल ः 
क्‍लास १ एसएक्‍स १ एक्‍स्पर्ट गट अ ः १) हरित नोह (टीव्हीएस आरटीआर२५०), २) सी. डी. जीनन (केएक्‍स२५० एफ), ऋग्वेद बारगुजे (टीव्हीएस आरटीआर२५०), ४) अब्दुल वाहिद तन्वीर (टीव्हीएस आरटीआर २५०), ५) अदनान अहमद (वायझेड१२५)
क्‍लास ७ - एसएक्‍स २- गट अ ः १) अदनान अहमद (वायझेड१२५), २) सुहैल अहमद (केटीएम३५०), ३) इ. एस. सजित (केएक्‍स२५०), ४) पृथ्वी सिंग (केएक्‍स२५०एफ), ५) जतीन जैन (केटीएम३५०). क्‍लास ८ - ज्युनियर ः १) आदिल कोरेय्या (कोचीन, एक्‍सपी१२५, ३७), २) युवराज कोंडेदेशमुख (पुणे, केटीएम ८५एसएक्‍स, ३५), ३) व्ही. प्रज्ज्वल (केटीएम८५एसएक्‍स), ४) इक्‍शन शानभाग (केटीएम६५एसएक्‍स, २२), ५) सार्थक चव्हाण (पुणे, केटीएम६५एसएक्‍स, २२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com