युकीचा विजय, अर्जुनसाठी टाळ्या

मुकुंद पोतदार
बुधवार, 3 जानेवारी 2018

पुणे - पुण्याच्या अर्जुन कढेने जागतिक क्रमवारीतील ४९२ क्रमांकांची तफावत असूनही अव्वल देशबांधव युकी भांब्री याच्याविरुद्ध झुंज दिली.

युकीला अपेक्षेपेक्षा जास्त झगडायला लागले; पण त्याने अनुभवाच्या जोरावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ असा विजय मिळविला, तर अर्जुनने शर्थीच्या प्रयत्नांबद्दल टाळ्या मिळविल्या. दुहेरीतील लढाऊ खेळानंतर अर्जुनने आशा उंचावल्या होत्या; पण काही वेळा दडपणामुळे, काही वेळा जादा आक्रमकतेमुळे, तर काही वेळा अनुभवाअभावी त्याचे फटके चुकले.

पुणे - पुण्याच्या अर्जुन कढेने जागतिक क्रमवारीतील ४९२ क्रमांकांची तफावत असूनही अव्वल देशबांधव युकी भांब्री याच्याविरुद्ध झुंज दिली.

युकीला अपेक्षेपेक्षा जास्त झगडायला लागले; पण त्याने अनुभवाच्या जोरावर दोन सेटमध्ये ६-३, ६-४ असा विजय मिळविला, तर अर्जुनने शर्थीच्या प्रयत्नांबद्दल टाळ्या मिळविल्या. दुहेरीतील लढाऊ खेळानंतर अर्जुनने आशा उंचावल्या होत्या; पण काही वेळा दडपणामुळे, काही वेळा जादा आक्रमकतेमुळे, तर काही वेळा अनुभवाअभावी त्याचे फटके चुकले.

युकी जागतिक क्रमवारीत ११६वा, तर अर्जुन ६०८व्या क्रमांकावर आहे. अर्जुनचे हे एटीपी टूरवरील मुख्य स्पर्धेतील पदार्पण होते. पहिल्या सेटमध्ये तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस गमावल्यानंतर अर्जुनने पुढच्याच गेममध्ये युकीची सर्व्हिस भेदली, पण युकीने पाचव्या गेममध्ये दुसरा ब्रेक मिळविला.

या ब्रेकच्या जोरावर त्याने हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दडपण वाढले असूनही अर्जुनने पहिला ब्रेक नोंदवीत तिसऱ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस भेदली. या वेळीसुद्धा युकीने ब्रेकची परतफेड लगेच केली. अर्जुनने काही रॅलीमध्ये बॅकहॅंडचे दोन्ही हातांनी मारलेले फटके प्रेक्षणीय होते. काही वेळा त्याने नेटजवळ धाव घेतही स्मॅश व ड्रॉप शॉट मारले.

पेस-पुरवचे पॅकअप
दुहेरीतील लक्षवेधी लढतीत गतविजेत्या रोहन बोपण्णा-जीवन नेदून्चेझीयन यांनी विजयी सलामी दिली. त्यांनी लिअँडर पेस-पुरव राजा यांच्यावर ६-३, ६-२ अशी मात केली. बोपण्णाच्या खेळाला जीवनने सक्षम साथ दिली. दुसरीकडे पेस-पुरव यांच्यात समन्वय नव्हता. 

सुमीतचा पराभव
इल्याने आक्रमक फटके मारत सुमितवर दडपण आणले. पहिल्या सेटमध्ये सुमितने चौथ्या गेममध्ये सर्व्हिस गमावली. त्यामुळे इल्याने ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर इल्याने लव्हने सर्व्हिस राखत सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये इल्याने पहिल्याच गेममध्ये ब्रेक मिळविला. तिसऱ्या गेममध्ये सुमितने एक ब्रेकपॉइंट वाचविला. त्या वेळी त्याचा पंचांशी वाद झाला. मग पाचव्या गेममध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. मग इल्याला सर्व्हिस राखणे आवश्‍यक होते; पण त्यालासुद्धा दडपणामुळे पहिल्या ब्रेकला सामोरे जावे लागले; पण पुढच्याच गेममध्ये सुमितने लव्हने सर्व्हिस गमावली. डबल फॉल्टसह त्याचा पराभव नक्की झाला.

सविस्तर निकाल
एकेरी (पहिली फेरी) - सुमित नागल (भारत) प. वि इल्या इव्हाश्‍का (बेलारूस) ६-३, ६-३. रॉबिन हासी (नेदरलॅंड्‌स ५) विवि ब्लाझ कावचिच (स्लोव्हेनिया) ७-६ (७-५), ७-५

दुहेरी (पहिली फेरी) - रॉबर्ट लिंडसेट (स्वीडन)-फ्रॅंको स्कुगॉर (क्रोएशिया) विवि मॅरटॉन फुचसोवीक्‍स (हंगेरी)-मिखाईल कुकुश्‍कीन (कझाकिस्तान) ६-४, ६-१. केव्हीन अँडरसन (दक्षिण आफ्रिका)-जोनाथन एर्लिच (इस्राईल) पराभूत विरुद्ध पिएर ह्युजेस हर्बर्ट-जिल्स सिमॉन (फ्रान्स) ३-६, ६-३, १०-५. रोमन जेबावी-यिरी वेसेली (चेक प्रजासत्ताक) विवि राडू अल्बॉट (मोल्डोवा)-टेनिस सॅंडग्रेन (अमेरिका) ६-४, ६-३.

एटीपी टूरच्या पातळीवर मोसमातील पहिला सामना नेहमीच खडतर असतो. अर्जुनने चांगला खेळ केला. त्याची सर्व्हिस चांगली झाली. अर्जुन काही वेळा पुढे आल्यानंतर मी पासिंग शॉट मारले, जे स्वाभाविक होते.
- युकी भांब्री

एकेरीच्या तुलनेत दुहेरीतील माझा खेळ सरस होता; पण एटीपी टूरच्या पातळीवर मी खेळू शकतो हा आत्मविश्वास या स्पर्धेने दिला. पुणेकरांनी मला दोन्ही दिवशी चांगले प्रोत्साहन दिले.
- अर्जुन कढे

Web Title: sports news tata open tennis competition