गॅटलिनच्या वेगाने  बोल्टची अपयशी अखेर

पीटीआय
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

लंडन - अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिन आणि ख्रिस्तियन कोलमन यांनी जमैकाचा महान धावपटू, वेगाचा बादशाह उसेन बोल्टच्या निवृत्तीची सोनेरी झळाळी अलगद काढून घेतली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या शर्यतीत गॅटलिन आणि कोलमनपुढे बोल्टला (९.९५ सेकंद) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. 

वयाच्या ३५व्या वर्षी तब्बल १२ वर्षांनी म्हणजे एका तपाने गॅटलिनने जागतिक मैदानी स्पर्धेत ९.९२ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घालती. त्याचाच सहकारी कोलमन रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 

उपांत्य फेरीत कोलमनने प्रथम बोल्टला शह दिला होता. उपांत्य फेरीच्या तिसऱ्या हिटमध्ये दुसऱ्या क्रमांकाने बोल्ट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम शर्यतीत बोल्टच्या शेजारूनच कोलमन धावत होता. भन्नाट वेग राखणाऱ्या कोलमनने बोल्टला मागे टाकले तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या. अखेरच्या लेनमध्ये धावणाऱ्या गॅटलिनकडे कुणाचेच लक्ष नव्हते. मात्र, अखेरच्या टप्प्यात गॅटलिनने वेग वाढवत या दोघांनाही मागे टाकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. शर्यत गॅटलिनने जिंकली असली, तरी शर्यतीनंतर महान कोण हे सांगण्याची गरज पडली नाही. गॅटलिन जिंकल्यानंतरही एकटा पडल्याचे चित्र होते. अवघे स्टेडियम बोल्टमय झाले होते. संपूर्ण मैदानाला बोल्टने फेरी मारली तेव्हा ठायीठायी याचा प्रत्यय येत होता. त्याही पेक्षा सर्वांच्या लक्षात राहणारा क्षण म्हणजे शर्यत संपल्यावर गॅटलिनने गुडघ्यावर बसत खाली वाकून बोल्टला अभिवादन केले. यातच बोल्टचे महानपण सामावलेले दिसून आले. 

सुरवातीने घात केला
बोल्टने अगदी खुल्यामनाने पराभव स्वीकारत आपल्याच खराब सुरवातीला दोषी धरले. तो म्हणाला,‘‘आयुष्यात असाही एक दिवस येतो. माझी खराब सुरवातच माझा घात करणारी ठरली. प्रत्येक फेरीमध्ये मी माझ्या प्रारंभामध्ये सुधारणा करतो. या वेळी मात्र हे जुळून आले नाही. मी हे करू शकलो नाही आणि म्हणूनच हरलो. प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा भन्नाटच होता. त्यांच्यामुळेच माझ्या कामगिरीला चालना मिळाली. त्यांच्यासाठी मी अखेरची शर्यत जिंकू शकलो नाही याचे शल्य कायम मनात राहील.’’
बोल्ट आता या आठवड्यात ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत धावणार आहे. शंभर मीटर शर्यतीमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी बोल्टला मिळणार आहे. अर्थात, गॅटलिन आणि बोल्ट यांच्यामधील ही अखेरची शर्यत असेल. 

महान प्रतिस्पर्धी
बोल्टच्या शेजारूनच धावत रौप्यपदकाला गवसणी घालणाऱ्या कोलमन याने बोल्टला महान प्रतिस्पर्धी म्हणून संबोधले. तो म्हणाला, ‘‘आम्ही दोघे सरस धावलो. त्याने सुवर्ण आणि मी रौप्यपदक जिंकले असते, तर अधिक आनंद झाला असता. बोल्टला धावताना पाहूनच मी मोठा झाला. तोच माझा आदर्श आहे. त्याच्यासोबत धावण्याचे भाग्य मला लाभले हा आनंद पदकापेक्षा अधिक आहे. बोल्टने आपल्या कामगिरीने ॲथलेटिक्‍सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.’’

Web Title: sports news Usain Bolt Justin Gatlin

टॅग्स