दंगलदेखील मॅटवर खेळवाव्यात - विनोद तोमर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - कुस्त्यांची मातीवर खेळली जाणारी दंगल मॅटवरही खेळविली जावी, त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल, असे मत भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी व्यक्त केले.

पुणे - कुस्त्यांची मातीवर खेळली जाणारी दंगल मॅटवरही खेळविली जावी, त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी होईल, असे मत भारतीय कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी व्यक्त केले.

सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने तोमर येथे आले आहेत. त्या वेळी संपर्क साधला असता, त्यांनी मते सविस्तर मांडली. ते म्हणाले, ‘‘मॅटवर कुस्ती खेळविण्यात आता उत्तरेकडील राज्यांनी सुरवात केली आहे. त्याचबरोबर आता सर्वोच्च वजनी गटाकडे (हेवीवेट) दुर्लक्ष करण्याची वेळ आली आहे. दंगली आयोजित करताना ऑलिंपिक वजनी गटांचा विचार  करायला हवा. पदक विजेते मल्ल याच वजनी गटातून मिळणार आहेत. एकाच वजनी गटाच्या दंगल आयोजित करून एकालाच घवघवीत पारितोषिक देण्यापेक्षा ती रक्कम वजनी गटात विभागून मिळाल्यास आपल्याच मल्लांना आधार मिळणार आहे.’’

ब्रिजभूषण यांच्याप्रमाणे तोमर यांनीदेखील गुणवत्ता असूनही महाराष्ट्र मागे राहात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आलो तेव्हा प्रत्येक वेळेस मला येथील कुस्तीविषयी असलेली निष्ठा वाढलेलीच दिसली. पण याचे रुपांतर पदकांत किंवा यशात झालेले दिसत नाही. याचा विचार त्यांनी करायला हवा. महाराष्ट्र केसरी किंवा अन्य कुस्तीच्या मैदानांना होणाऱ्या गर्दीत अडकून न पडता कुस्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले तरच महाराष्ट्रातील कुस्ती प्रगतिपथावर येईल.’’

तोमर म्हणाले...
सुशील कुमारचे पहिले ऑलिंपिक पदक देशातील कुस्तीला दिशा देण्यासाठी प्रेरक ठरले.
रिओ ऑलिंपिकसाठी झालेला वाद दुर्दैवी होता. नरसिंगच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले नाही.
नरसिंग उत्तेजक घेणारा मल्ल नाही. जेव्हा जेव्हा चाचणीसाठी बोलावले तेव्हा तो उपस्थित राहिला.
ऑलिंपिकसाठी पात्र ठरल्यावर कुणी अशी चूक करणार नाही.
हरियाना हा भारतातील कुस्तीचा गड आहे. 
या वेळी ऑलिंपिकमध्ये पदकांची संख्या वाढेल.

Web Title: sports news Vinod Tomar wrestling