सेंटर कोर्टचे गवत वादाचे ‘सेंटर’

पीटीआय
रविवार, 9 जुलै 2017

सॉरी विंबल्डन, तुम्हाला विरोध नाही, पण काही ठिकाणी सुधारणा होण्याची गरज आहे. खास करून १८ नंबरच्या कोर्टवरील गवताचा दर्जा निराशाजनक आहे. ते धोकादाय आहे असे नाही, पण दुसऱ्याच दिवशी गवत निघून गेले होते.
- टिमीया बॅसिन्स्की, स्वित्झर्लंडची टेनिसपटू

लंडन - जगप्रसिद्ध विंबल्डनच्या सेंटर कोर्टवरील गवत यंदा वादाचे सेंटर ठरते आहे. पहिल्या दिवशी स्पर्धेला सुरवात झाल्यापासून अनेकांनी गवताचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता एक आठवडा पूर्ण होत असताना यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेल्यांमध्ये होम फेव्हरीट अँडी मरे याचा समावेश झाला आहे. ऑल इंग्लंड क्‍लबने मात्र कोर्टची तयारी पूर्वीप्रमाणेच अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे होत असल्याचे स्पष्ट केले.

उष्ण हवामान आणि थोड्या पावसामुळे अनेक कोर्टवरील गवत निघून गेले आहे. विंबल्डनची अशी ग्रास कोर्ट खेळाडूंसाठी धोकादायक स्थितीत असल्याचे मरेने सांगितले. तो म्हणाला की, सेंटर कोर्टवर बऱ्याच ठिकाणी खेळाडूंच्या बुटांचे ठसे उमटून आणि चेंडूचे टप्पे पडून छोटे-छोटे खड्डे पडले आहेत. पूर्वीप्रमाणे ही कोर्ट चांगल्या स्थितीत नाहीत. बेसलाइनच्या मागे तसेच पुढे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. घोड्याच्या टापांमुळे पडतात तसे हे खड्डे आहेत. पूर्वी असे कधीही घडल्याचे मला आठवत नाही.

मरेने इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनीवर ६-२, ४-६, ६-१, ७-५ अशी मात केली. फॉग्नीनीनेसुद्धा कोर्टची अवस्था फार खराब असल्याचे मत व्यक्त केले.

कोर्ट नंबर १८च्या स्थितीवर बऱ्याच जणांनी टीका केली आहे. याच कोर्टवर गोल खड्डा पडल्याचे फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लाडेनोविच हिने म्हटले आहे. तिची लढत ॲलीसन रिस्केशी होती. आम्हा दोघींना खेळ थांबवायचा होता, असे क्रिस्टिनाने सांगितले. तीन सेटमध्ये हरल्यानंतर क्रिस्टिना म्हणाली की, ‘बेसलाइनवरील जागा निसरडी होती. तेथे गवतच नव्हते. एका बाजूला मोठा खड्डा होता. ती जागा सपाटही नव्हती.’ याच कोर्टवर मंगळवारी खेळल्यानंतर स्वित्झर्लंडच्या टिमीया बॅसिन्स्कीने तक्रारीचा सूर काढला होता.

कोर्ट नंबर १७ वर अमेरिकेची बेथानी मॅटेक-सॅंड्‌स पाय मुरगाळून पडली आणि तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. कोर्टच्या अवस्थेमुळे ती पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फेडररची भूमिका
सात वेळचा विजेता फेडरर म्हणाला की, ‘दोन्ही खेळाडूंनी कोर्टच्या स्थितीबद्दल तक्रार केली, तर ती गांभीर्याने घेतली जावी. हवामान फार उष्ण आहे.’

दुहेरीतील माजी विजेत्या पाम श्रायव्हर यांनीही ट्‌वीट केले. त्या म्हणाल्या की, मी खेळले तेव्हा कोर्टवर भक्कम हालचाल करणे शक्‍य होते. केवळ कोर्ट ओले झाले असेल तरच अडथळा यायचा. आता कोर्टचे रोलींग केले जाते. त्यामुळे पृष्ठभाग हार्ड कोर्टप्रमाणे बनतो. अशावेळी हालचाल करणे अवघड जाते.

Web Title: sports news Wimbledon 2017