यजमानांसमोर कोल्हापूर,सांगलीचे आव्हान

यजमानांसमोर कोल्हापूर,सांगलीचे आव्हान

पुणे - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६१व्या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील कुस्ती क्षेत्र ढवळून निघणार आहे. राज्यातील जवळपास ९०० मल्ल शड्डू ठोकून आखाड्यात उतरणार आहेत. विजेतेपद आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताब या उद्देशाने उद्यापासून राज्यातील सहभागी मल्ल आणि कुस्ती चाहते झपाटलेले असतील. पुण्याला सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला असून, या वेळी भूगाव येथे ही स्पर्धा होईल.

घरच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेत पुण्याला विजेतेपद मिळविण्याची चांगली संधी असली, तरी कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीचे मल्ल यजमानांसमोर आव्हान उभे करण्याची क्षमता राखून आहेत. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात विजेतेपदासाठी जबरदस्त चुरस बघायला मिळणार यात शंका नाही. प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी पुण्याचा अभिजित कटके, चंद्रहार पाटील, किरण भगत आणि माउली जमदाडे यांना पसंती मिळत आहे. चंद्रहार पाटील यापूर्वी दोन वेळा किताबाचा मानकरी असून नरसिंग, विजय चौधरीप्रमाणे तो या वेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी मोठ्या तयारीने उतरला आहे. विविध वजनी गटांत सूरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी विरकर, ज्योतिबा आटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील. 

राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र केसरी किताबी लढतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या तालुक्‍यात प्रथमच ही स्पर्धा होणार असल्यामुळे या वेळी या स्पर्धेला विशेष महत्त्व आले आहे. साहजिकच मैदानास ‘स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी’ असे नाव देण्यात आले असून, या वेळी प्रथमच मैदानात मॅट आणि मातीचे प्रत्येकी दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत.  

स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते  होणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात स्पर्धा
पुण्यात सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा उत्सव होत आहे. यापूर्वी गतवर्षी वारजे येथे; तर २००९ मध्ये सांगवी आणि २०१४ मध्ये भोसरी येथे ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सर्वाधिक स्पर्धा संयोजनातही पुणे अग्रेसर आहे. यापूर्वी ११ वेळा पुण्यात ‘केसरी’चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

काका पवारचे १२ मल्ल किताबी लढतीत 
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दशकापूर्वी गोकुळ वस्तादाचे सर्वाधिक मल्ल मैदानात उतरायचे. आता अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील तब्बल १२ मल्ल किताबी लढतीत नशीब अजमविणार आहेत. केसरी गटात एकाच तालमीतील विक्रमी १२ मल्ल पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. माती विभागातून किरण भगतसह ज्ञानेश्वर गोचडे, अतुल पाटील, गोकुळ आवारे, योगेश पवार मॅटमधून पोपट घोडके, शिवराज राक्षे, कौतुक डाफळे, विकी जाधव, मोहसीन सौदागर, गणेश जगताप, नीलेश लोखंडे केसरीच्या लढतीत खेळणार आहे. याशिवाय विविध वजनी गटांत काका पवार यांचे ५३ मल्ल पदकासाठी शर्थ करताना दिसतील.

९०० मल्ल आणि दहा वजनी गट
संलग्न ४५ जिल्हा संघटना, शहर तालीम संघातील ९०० मल्लांचा सहभाग
जागतिक संघटनेच्या नियमानुसार दहा वजनी गट
‘अ’ गटात ५७, ७४, ७९ किलो, ‘ब’ गटात ६१, ७०, ८६ किलो, ‘क’ गटात ९७ किलो, ‘ड’ विभागात ६५ आणि  ९२ किलो, महाराष्ट्र केसरी’साठी  १२५ किलो
किताब पटकाविणाऱ्यास चांदीची गदा आणि चार चाकी गाडी
उपमहाराष्ट्र केसरी, ९७ किलो गटातील दोन्ही विभागातील विजेत्यास बुलेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com