श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा निश्‍चित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द होण्याची शक्‍यता होती, पण संघ पाकिस्तानात लक्ष्य होण्याची इशारा श्रीलंका सरकारला मिळालेला असतानाही संघ पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

कोलंबो : सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द होण्याची शक्‍यता होती, पण संघ पाकिस्तानात लक्ष्य होण्याचा इशारा श्रीलंका सरकारला मिळालेला असतानाही संघ पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तान दौऱ्यासाठी मंजुरी दिल्याचे श्रीलंका क्रिकेटचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी सांगितले. संघासोबत आपण तसेच श्रीलंका क्रिकेटचे काही पदाधिकारीही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी म्हणजेच मार्च 2009 मध्ये यापूर्वी श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी संघाच्या बसवर हल्ला झाला होता. त्यात सहा खेळाडू जखमी झाले होते.

श्रीलंका क्रिकेट संघावर पाकिस्तानात हल्ला होऊ शकतो, असा इशारा श्रीलंका पंतप्रधान कार्यालयाने श्रीलंका क्रिकेटला दिला होता. मात्र आता संरक्षण मंत्रालयाची मंजुरी असल्याचे सांगितले जात आहे. आता संघासाठी पाकिस्तान दौऱ्याच्यावेळी राष्ट्रप्रमुखाइतकी सुरक्षा असेल, असे आश्‍वासन पाकिस्तान सरकारने दिले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या सुरक्षा पथकाने यापूर्वीच सर्व काही ठीक असल्याचे सांगितले होते. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली एकदिवसीय लढत 27 सप्टेंबरला कराचीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri lanka cricket team will tour pakistan as scheduled