श्रीकांतची आगेकूच, पण प्रणीतची हार

श्रीकांतची आगेकूच, पण प्रणीतची हार

मुंबई, ता. 28 ः काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या किदांबी श्रीकांत आणि सौरभ वर्माने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, पण एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेनचे आव्हान आटोपले.
तिसऱ्या मानांकित श्रीकांतने पारुपली कश्‍यपचे आव्हान तीन गेमच्या लढतीत 18-21, 22-20, 21-16 असे परतवले. ही स्पर्धा यापूर्वी श्रीकांतने एकदा; तर कश्‍यपने दोनदा जिंकली आहे. दुसरा गेम जादा गुणांवर जिंकल्यावर कश्‍यपची जणू खेळावरील पकडच निसटली आणि तो पराजित झाला. जागतिक क्रमवारीत बारावा असलेल्या श्रीकांतसमोर आता सातव्या मानांकित सॉन वॅन हो याचे आव्हान असेल.
हैदराबाद तसेच व्हिएतनाम स्पर्धा जिंकलेल्या सौरभ वर्माने आलाप मिश्राचा 21-11, 21-18 असा पाडाव केला. आता त्याच्यासमोर थायलंडच्या कुनालवुत वितिदसार्न याचे आव्हान असेल. त्याने जागतिक ब्रॉंझ विजेत्या साई प्रणितला 21-11, 21-17 असे हरवून भारतीयांना धक्का दिला.
प्रणीतच्या पराभवातून सावरण्यापूर्वीच तीन महिन्यांत चार स्पर्धा जिंकलेला लक्ष्य सेन पराजित झाल्याचे कळले. तो काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सॉन वॅन हो याच्याविरुद्ध पराजित झाला. लागोपाठच्या स्पर्धांमुळे आपण थकलो होतो असे लक्ष्यने सांगितले. मुंबईच्या अजय जयरामलाही पराभव पत्करावा लागला. तो चीनच्या झाओ जुन पेंगविरुद्ध पराभूत झाला. अजयने ही लढत 18-21, 21-14, 28-30 अशी गमावली. निर्णायक गेममध्ये अजयने 13-4 आघाडी दवडली. माजी जागतिक कुमार उपविजेता सिरील वर्मा यालाही तीन गेममध्ये हार पत्करावी लागली.
अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डीला त्यांची लढत सोडून द्यावी लागली. दुखापतीमुळे महिलाच नव्हे; तर मिश्र दुहेरीतून माघार घेतली असल्याचे अश्विनीने सांगितले. सिमरन सिंघी- रितिका ठकार यांनी मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com