घरच्या मैदानावर गुजरात सरस

घरच्या मैदानावर गुजरात सरस

अहमदाबाद - नवोदित खेळाडूंसह खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंटस संघाने घरच्या मैदानावरील आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्सला २७-२० असे पराभूत केले. त्यापूर्वी उत्तर प्रदेश योद्धाज संघाला आघाडीचा फायदा उठवता आला नाही. पाटणा पायर्टस संघाने त्यांना २७-२७ असे बरोबरीत रोखले. 

अनुभवी मनजित चिल्लर आणि जसवीर सिंग यांना पूर्ण निष्प्रभ ठरवत गुजरातने मिळविलेला विजय निश्‍चितच त्यांच्या प्रतिभेची ओळख करून देणारा होता. कर्णधार सुकेश हेगडे अपयशी ठरत असताना पुन्हा एकदा सचिनच्या खोलवर आणि वेगवान चढायांच्या जोरावर गुजरातने मध्यंतराच्या १०-१० अशा बरोबरीनंतर विजय खेचून आणला. उत्तरार्धात त्यांनी जयपूरवर नोंदवलेला लोण आघाडी वाढवण्यात निर्णायक ठरला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सचिनच्या चढायांना कोपरारक्षक अबोझर मिघानी याने केलेल्या पकडींची अचूक साथ मिळाली. मध्यरक्षक म्हणून परवेश भैन्सवाल आणि फजल अत्राचेली यांनी देखील आपली भूमिका चोख बजावली. गुजरातकडून चढायांमध्ये मनजित आणि जसवीरला आलेले अपयशच त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. 

नरवालचा खेळ निर्णायक
उत्तर प्रदेश संघाला मिळवलेली आघाडी टिकवता आली नाही. पाटणाचा यशस्वी चढाईपटू प्रदीप नरवालच्या खेळाचे त्यांनी केलेले ‘होमवर्क’ पूर्वार्धात जबरदस्त होते. त्यांनी प्रदीपला पूर्ण निष्प्रभ केले. पण, या अपयशाने जणू तो प्रेरित झाला आणि उत्तरार्धात आपल्या संघाला त्याने पराभवापासून दूर ठेवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com