राज्याची सूत्रे मराठी बुद्धिबळ संघटनेकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेतील संघर्ष आता संपला आहे, असे म्हणता येईल. २०१६ हे कॅलेंडर वर्ष संपत असताना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना बरखास्त झाली होती, तर २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपत असतानाच राज्यातील बुद्धिबळाची सूत्रे अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेकडे देण्याचा निर्णय भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीत झाला होता.

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेतील संघर्ष आता संपला आहे, असे म्हणता येईल. २०१६ हे कॅलेंडर वर्ष संपत असताना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना बरखास्त झाली होती, तर २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपत असतानाच राज्यातील बुद्धिबळाची सूत्रे अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेकडे देण्याचा निर्णय भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीत झाला होता.

राज्य बुद्धिबळातील संघर्ष संपुष्टात येत नाही, तो वाढतच आहे हे पाहून डिसेंबरच्या अखेरीस महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना बरखास्त झाली होती आणि राज्याचा कारभार अस्थायी समितीकडे सोपवला होता. याच कालावधीत राज्यातील बुद्धिबळातील राजकारणाने त्रासलेल्या खेळाडू, प्रशिक्षकांनी एकत्र येत अखिल मराठी बुद्धिबळ संघटना स्थापन केली होती. त्यांना राज्यातील २२ जिल्ह्यांचा पाठिंबा लाभला होता. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे भारतीय बुद्धिबळ महासंघासमोर सादर केल्यानंतर आज या संघटनेस मान्यता देण्याचा निर्णय झाला आहे, असे नव्या संघटनेचे सचिव संजय केडगे यांनी सांगितले. आमच्या संघटनेस मान्यता दिल्यामुळे अर्थातच अस्थायी समितीचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.

आम्ही यापूर्वीच भारतीय बुद्धिबळ महासंघाकडे संघटनेसाठी अर्ज पाठवला होता. त्यासोबत आमच्यासोबत येण्यास तयार असलेल्या जिल्हा संघटनांची संमतीपत्रेही जोडली होती. चेन्नईत आज झालेल्या मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. त्या वेळी आम्हाला आता यापुढे कोणतेही संघटनात्मक संघर्ष न करता खेळाच्या प्रगतीसाठी काम करण्यास सांगितले, असेही केडगे यांनी सांगितले. 

आता राज्यातील बुद्धिबळाचे नियमन तसेच नियंत्रण करण्याची जबाबदारी या नव्या संघटनेवर असेल. या संघटनेची यापूर्वीच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आहे. आता राज्यातील सर्व खेळाडू, पंच संघटकांना याच संघटनेकडे संपर्क साधणे भाग असेल. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश चराटे आहेत, तर सचिव संजय केडगे आहेत. याशिवाय उदय पवार (उपाध्यक्ष), प्रफुल झवेरी (कार्याध्यक्ष), जयंत गोखले (संयुक्त सचिव), राजेंद्र कोंडे (कोषाध्यक्ष) आणि विठ्ठल माधव (सदस्य) हे संघटनेच्या कार्यकारिणीत आहेत. 

राज्यातील बुद्धिबळातील वातावरण बिघडले होते. सर्वांसह एकत्र काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र हे बुद्धिबळातील प्रगत राज्य आहे. त्याची अधिक प्रगती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- संजय केडगे, अखिल मराठी बुद्धिबळ संघटना सचिव
 

Web Title: State Chess Association