राज्य बुद्धिबळ संघटनेच्या कारभाराची अनिश्‍चितताच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना बडतर्फ करण्याचा निर्णय अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मध्यवर्ती समितीने घेऊन 10 दिवस झाले, तरी अद्याप राज्य संघटनेचा कारभार बघण्यासाठी अस्थायी समितीची नियुक्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे राज्य बुद्धिबळात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.

संघटनेतील संघर्ष मुदतवाढ दिल्यानंतरही थांबत नव्हता. त्यासाठी झालेले राज्यातील प्रयत्न फोल ठरले होते. प्रत्यक्ष बैठकीच्या दिवशीही ते विफल ठरले होते. त्यामुळे अखेर 25 डिसेंबरला झालेल्या बैठकीत राज्य संघटनेस बडतर्फ करण्यात आले होते.

नववर्ष सुरू होण्यापूर्वी या संदर्भातील अधिकृत घोषणा होईल; तसेच अस्थायी समितीचीही नियुक्ती होईल, असे अभ्यासक; तसेच भारतीय महासंघाचे पदाधिकारी सांगत होते. मात्र, अजूनही काहीच निर्णय जाहीर झालेला नाही. काही अभ्यासक नेमके काय सुरू आहे, हेच कळत नसल्याचे सांगत आहेत. एका संघटकाने कदाचित तडजोड झाली असेल, असाही अंदाज व्यक्त केला.

भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या अध्यक्ष परदेशात गेले आहेत. ते पुढील आठवड्यात परतणार आहेत. त्यानंतर अस्थायी समितीची नियुक्ती जाहीर होईल, असे सांगितले. राज्य संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पुढील आठवड्याच्या सुरवातीस हा निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले.

भारतीय बुद्धिबळ महासंघ राज्य संघटनेस पुढील आठवड्यात पत्र लिहिणार आहे. त्या वेळी सर्व काही कळवण्यात येईल. अध्यक्ष महत्त्वाच्या कामासाठी परदेशात गेल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबली आहे.
- डी. व्ही. सुंदर, कार्यालयीन सचिव

Web Title: state chess organisation