पुणे कुमार संघाचाही डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
कन्नड (औरंगाबाद) - ऐन दिवाळीत दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचा कित्ता गिरवत पुण्याच्या कुमार खेळाडूंनीदेखील दिवाळीच्या अखेरच्या दिवशी राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. 

राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
कन्नड (औरंगाबाद) - ऐन दिवाळीत दुहेरी विजेतेपद मिळविणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंचा कित्ता गिरवत पुण्याच्या कुमार खेळाडूंनीदेखील दिवाळीच्या अखेरच्या दिवशी राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. 

येथील कनकावती नगर येथे राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम लढतीत पुण्याच्या मुलांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी सांगली जिल्हा संघाचा ४०-२२ असा पराभव केला. वैभव महाजन, अक्षय वडाणे आणि भीमा मानपाडे यांच्या पकडीने सांगलीच्या चढाईपटूंची कोंडी केल्यावर किरण मगर, बबलू गिरी आणि मयूर तांबोळी यांनी प्रतिस्पर्ध्यांचा बचाव खिळखिळा करणाऱ्या चढाया करून विश्रांतीलाच ३०-६ अशी आघाडी घेत विजय निश्‍चित केला होता. उत्तरार्धात नंतर विजयाधिक्‍य वाढवण्याची औपचारिकता त्यांनी पार पाडली. तीन लोण स्वीकारणाऱ्या सांगलीला उत्तरार्धात पुणे संघावर एक लोण दिल्याचे समाधान लाभले.

मुलींच्या अंतिम लढतीत पुणे संघाने साताऱ्याचे आव्हान ३१-१५ असे परतवून लावले. विश्रांतीला पुणे संघ ९-१० असा एका गुणाने पिछाडीवर होता. मात्र, उत्तरार्धात काजल जाधव, सत्यवा हळदकेरी यांच्या चढाया आणि अंकिता चव्हाण, अंजली मुळे यांनी केलेल्या पकडीमुळे सातारा संघावर लोण बसला आणि पुणे संघाने मागे वळून बघितले नाही. आणखी एक लोण देत त्यांनी साताऱ्याच्या आव्हानातील हवा काढून घेतली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 
 

मुलांनी प्रत्येक सामना सांघिक भावनेने खेळला. संघात कुणी कमी नव्हते. प्रत्येक जण समान ताकदीचा होता. अंतिम संघनिवडीचे आव्हान वगळता आमच्यासमोर मैदानात कधीच आव्हान उभे राहिले नाही. विजेतेपदाच्या ध्येयाने मुले खेळली.
- मंगेश मुरकुटे, मुलांच्या संघाचे प्रशिक्षक

Web Title: state kabaddi competition