Steve Smith : ताकदीचे फटके नसले तरी टायमिंगची कला कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Smith

Steve Smith : ताकदीचे फटके नसले तरी टायमिंगची कला कायम

मेलबर्न : कॅमेरून ग्रीनसारखे ताकदीचे फटके मारत नसलो तरी अचूक टायमिंग साधत मी सुद्धा चेंडू सीमापार मारू शकतो, मला कमजोर किंवा दुर्लक्षित समजू नका, अशा शब्दांत माजी कर्णधार आणि हुकमी फलंदाज स्टीव स्मिथने आपल्याच क्रिकेट मंडळाला सुनावले आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात स्टीव्ह स्मिथऐवजी विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड नसलेल्या कॅमेरून ग्रीनला संधी देण्यात आली. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका करण्यात आली आहे.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडकासाठी वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका महत्त्वाची असून, विश्वकरंडकासाठीच्या संघात ग्रीनचा समावेश नसला तरी त्याला वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळवले गेल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कनेसुद्धा क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका केली असून स्मिथला विश्वकरंडकासाठीच्या सरावासाठी वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत खेळवायला पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे मी परिस्थितीनुसार फलंदाजी करत आलो असून, ट्वेन्टी-२० साठी लागणाऱ्या आक्रमक फलंदाजीचासुद्धा सराव करत आहे. मला मैदानावरील परिस्थितीनुसार फलंदाजी करायला आवडते. अचूक टायमिंग आणि एकेरी धावा चांगल्या प्रकारे घेता येतात आणि हीच माझी जमेची बाजू आहे, असेही स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला. वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गोलंदाज खेळवले होते. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा १ चेंडू आणि तीन फलंदाज राखून पराभव केला होता. आज झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मात्र स्टीव्ह स्मिथला संघात जागा देण्यात आली आहे.