"आरपीएस'च्या कर्णधारपदी आता धोनीऐवजी स्मिथ

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

संघामध्ये तारुण्य व अनुभवाचे चांगले मिश्रण आहे आणि आता संघास नव्या कल्पनांसहित पुढे घेऊन जाणारा तरुण कर्णधार आम्हांस हवा आहे

नवी दिल्ली - भारतीय प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) संघासाठीच्या लिलावास अवघ्या एक दिवस आधी "रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स' (आरपीएस) या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनी याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

"येत्या आयपीएल मोसमासाठी आरपीएस संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्मिथ याच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आयपीएल मोसमाच्या अखेरपासून यासंदर्भातील विचार माझ्या मनात घोळत होता. मी याविषयी संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली आहे. संघासाठी आता तरुण कर्णधार असावा, असा आमचा विचार आहे. संघामध्ये तारुण्य व अनुभवाचे चांगले मिश्रण आहे आणि आता संघास नव्या कल्पनांसहित पुढे घेऊन जाणारा तरुण कर्णधार आम्हांस हवा आहे,'' असे गोयंका म्हणाले.

आरपीएस संघ हा गेल्या वर्षी आयपीएलच्या क्रमवारीत सातव्या स्थानी फेकला गेला होता. या पार्श्‍वभूमीवर, संघाचे कर्णधारपद हे धोनीकडून स्मिथकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Steve Smith to replace MS Dhoni as Rising Pune Supergiants captain