सुमीत नवा "हिंदकेसरी' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा "हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले. 

पुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा "हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील सणस मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत कुस्ती भलेही निकाली झाली नसली, तरी मल्लांचे मातीतील कौशल्य चाहत्यांच्या मनात घर करून केले. उपांत्य फेरीच्या प्रत्येकी दोन लढती खेळल्यावर तासाभरात दोन्ही मल्ल विजेतेपदाच्या लढतीसाठी आखाड्यात उतरले होते. दोघांची दमछाक निश्‍चित झाली होती. त्यांची देहबोलीच बोलत होती. तरी देखील कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमीतने बाजी मारली. अभिजितला "महाराष्ट्र केसरी' पाठोपाठ "हिंदकेसरी' लढतीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

दोन वर्षांपूर्वी "भारत केसरी' ठरलेल्या सुमीतने कुस्तीच्या पहिल्याच मिनिटाला अभिजितला बाहेर ढकलत गुणाचे खाते उघडले. त्यानंतर आक्रमक होत एकेरीपट काढून दोन गुणांची कमाई केली. चौथ्या मिनिटाला पुन्हा एकदा अभिजितला बाहेर ढकलत त्याने दोन गुणांची कमाई करत चार मिनिटांतच 4-0 अशी आघाडी मिळवली. सहाव्या मिनिटाला अभिजितने आपला हुकमी दुहेरी पटाचा डाव टाकत सुमीतला खाली दाबत दोन गुण मिळविले. मात्र, सुमीतच्या तुलनेत अभिजितची अधिक दमछाक झालेली दिसून आली. पहिल्या फेरीच्या सातव्या मिनिटाला अभिजितचा ढाक टाकण्याचा डाव फसला. धिप्पाड असूनही सुमीतने स्वतःची सुटका करून घेत कुस्ती बाहेर ढकलत दोन गुणांची कमाई केली. 

विश्रांतीला 6-2 अशी आघाडी घेतल्यावर दुसऱ्या फेरीची सुरवात संथ होती. पहिली चार मिनिटे खडाखडीतच गेली. पाचव्या मिनिटाला अभिजितने आकडी डाव टाकण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण, या वेळीही सुमीत सटकला आणि त्याच्यावर डाव उलटवत त्याने दोन गुण मिळविले. त्यानंतर निष्क्रिय कुस्ती केल्याचा फटका अभिजितला बसला. त्याचा आयता आणखी एक गुण सुमीतला मिळाला. 

उपांत्य फेरीत अभिजितला हरवल्यामुळे विजेतेपदाचा विश्‍वास होता. लहानपणापासून "हिंदकेसरी'चे स्वप्न बाळगले होते. ते सुवर्णमहोत्सवी वर्षात साकार झाले. आता राष्ट्रीय स्तरावर देखील भारताचे नाव उंचावण्याची मनीषा आहे. 

Web Title: Sumit Hindkesari