स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉय, शुभंकर तिसऱ्या फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

बासेल (स्वित्झर्लंड) - गतविजेत्या एच. एस. प्रणॉयसह शुभंकर डे या भारतीय बॅडमिंटनपटूंनी गुरुवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रणव चोप्रा- एन. सिक्की रेड्डी यांनीही मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित प्रणॉयने स्कॉटलंडच्या किएरन मेरिलीस याचे आव्हान 21-17, 21-19 असे संपुष्टात आणले. त्याची गाठ आता चीनच्या क्विआओ बिनशी पडेल. शुभंकरने स्लोव्हेनियाच्या इझटोक उत्रोसा याचा 21-17, 21-18 असा पराभव केला. त्याची गाठ जपानच्या कांता त्सुनेयामा याच्याशी पडेल. त्याने भारताच्या समीर वर्मा याचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव केला. ही लढत 1 तास सहा मिनिटे चालली. मिश्र दुहेरीत चौथ्या मानांकित प्रणव-सिक्की यांना विनासायास तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. त्यांना स्वीडनच्या निको रुपोनेन आणि अमांडा हॉगस्ट्रॉम जोडीने पुढे चाल दिली. मनू अत्री-बी. सुमीथ रेड्डी यांना अव्वल मानांकित चई बिआओ-हॉंग वेई यांच्याकडून 15-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला.
Web Title: swiss open badminton competition