Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamil Nadu vs Karnataka Final
Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

Syed Mushtaq Ali Trophy : शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

sakal_logo
By
सुशांत जाधव

Syed Mushtaq Ali Trophy Tamil Nadu vs Karnataka Final : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये तामिळनाडूने विक्रमी जेतेपद पटकावले. धावांचा पाठलाग करताना रंगतदार सामन्यात त्यांनी 4 गडी राखून कर्नाटकला पराभूत केले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 1 चेंडूत 5 धावांची गरज होती. प्रतिक जैनच्या चेंडूवर षटकार खेचून शाहरुख खानने संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. तामिळनाडूचे हे आतापर्यंतचे तिसरे जेतेपद आहे. या विजयासह तामिळनाडू सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिकवेळा जेतेपद मिळवणारा संघ ठरलाय. कर्नाटकने यापूर्वी मनिष पांड्येच्या नेतृत्वाखाली दोन वेळा स्पर्धा जिंकली होती. त्यांनी विक्रमी तिसऱ्यांदा चषक उंचावण्याची संधी गमावली आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या. खराब सुरुवातीनंतर अभिनव मनोहरने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 46 धावांची आश्वासक खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूच्या जगदिशनने 41 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात शाहरुख खानने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हातून निसटलेला सामना तामिळनाडूनं आपल्या नावे केला. शाहरुखने 15 चेंडून 33 धावांची नाबाद आणि मॅच विनिंग खेळी केली.

अखेरच्या षटकात हव्या होत्या 16 धावा

तामिळनाडूच्या संघाला अखेरच्या 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. कर्नाटकचा कर्णधार मनिष पांड्येनं शेवटच्या षटकासाठी प्रतिक जैनच्या हाती चेंडू सोपवला. साई किशोरने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून मॅच सोडली नसल्याचे संकेत दिले. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. शाहरुख खान स्ट्राइकला आल्यावर जैनने तिसरा चेंडू व्हाइड टाकला. त्यानंतर पुन्हा टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर शाहरुखला केवळ एक धाव मिळाली. चौथ्या चेंडूवर साई किशोरने पुन्हा एकच धाव घेतली. जैनन आणखी एक व्हाइड चेंडू फेकला. पाचव्या चेंडूवर शाहरुखने दोन धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची गरज होती. शाहरुख खानने षटकार खेचून संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

loading image
go to top