T20 World Cup : आशिया चॅम्पियन श्रीलंकेला नामिबियाने दिवसा दाखवले तारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 world cup 2022 namibia beats asia cup champions sri lanka

T20 World Cup : आशिया चॅम्पियन श्रीलंकेला नामिबियाने दिवसा दाखवले तारे

SL vs NAM T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सलामीच्या सामन्यात नामिबियाने आशिया कप चॅम्पियन संघ श्रीलंकेचा पराभव केला. श्रीलंकेच्या संघाला 164 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. हे साध्य करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकांत 108 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना 55 धावांनी गमवावा लागला. या पराभवानंतर श्रीलंकेच्या सुपर 12 मध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात 28 चेंडूत 44 धावा आणि 26 धावांत 2 बळी घेणाऱ्या फ्रायलिंकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा: IND vs PAK T20 World Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! भारत-पाक सामना होणार रद्द ?

श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीवीर कुशल मेंडिसला डेव्हिड वेसने झेलबाद केले. श्रीलंकेचा संघ अजून या धक्क्यातून सावरत होता तितक्यात चौथ्या षटकाच्या सलग दोन चेंडूंवर त्यांचे दोन फलंदाज पथुम निसांका आणि धनुष्का गुणतिलाका बाद झाले. काही षटकांनंतर धनंजय डी सिल्वाही 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेने 40 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर भानुका राजपक्षे आणि कर्णधार दासुन शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी 24 चेंडूत 34 धावा जोडल्या. काही प्रमाणात श्रीलंकेचा डाव रुळावर आल्याचे दिसून आले. पण राजपक्षे बाद होताच ही जोडी फुटली. यानंतर श्रीलंकेचे खालच्या फळीतील फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत आणि टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या धावसंख्या ने पराभव झाला.

हेही वाचा: Shikhar Dhawan : मला न विचारला लग्न कसं ठरवता? धवन पप्पांवर चिडला

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने शेवटच्या पाच षटकांत 68 धावा केल्या आणि 20 षटकांत सात गडी गमावून 163 धावा केल्या. मात्र नामिबियाची सुरुवात चांगली झाली नाही. 93 धावांवर त्यांनी सहा विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर जेन फ्रायलिंक (28 चेंडूत 44 धावा) आणि जेजे स्मित (16 चेंडूत 31*) यांनी संघाची धुरा सांभाळली आणि मजबूत भागीदारी रचली. दोन्ही खेळाडूंनी सातव्या विकेटसाठी 33 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने सर्वाधिक दोन बळी घेतले.