T20 World Cup : पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाशी सामना, शमीकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

T20 World Cup : पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाशी सामना, शमीकडे लक्ष

T20 World Cup 2022 Team India : २०२० साली याच मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी सामन्यात पराभूत करून मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता. तिथेच १७ आणि १९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ दोन सराव सामने ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर खेळून मग टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात करणार आहे. सोमवारी होणारा सामना अधिकृत टी-२० आंतरराष्ट्रीय सामना धरला जाणार नसला तरी त्याचे तयारीच्या दृष्टीने महत्त्व कमी होत नाही. पहिल्या सराव सामन्यात मुख्य लक्ष जसप्रीत बुमराच्या जागी संघात दाखल झालेल्या मोहम्मद शमीकडे असेल.

हेही वाचा: T20 WC 2022 : रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँड्सने UAE चा केला पराभव

पर्थला सरावाबरोबर काही सामने खेळून भारतीय संघ आता ब्रिस्बेनला पोहोचला आहे. दोन सराव सामन्यांत भारतीय संघाला गोलंदाजी आणि मधल्या फळीतील फलंदाजीच्या प्रश्नांची ठोस उत्तरे शोधायची आहेत. सोमवारी यजमान ऑस्ट्रेलियन संघासमोर सराव सामना होईल, ज्यात दोनही संघ जिंकण्या व हरण्यापेक्षा संघ बांधणीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा: T20 World Cup : लाइव्ह मॅचमध्ये बॅट्समन पडला तोंडावर, व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाकरता पाचव्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला प्राधान्य द्यायचे याचा विचार पक्का केला जाईल. त्याचबरोबर मोहम्मद शमी मैदानात उतरून काय लयीत गोलंदाजी करतो हे बघणे औत्सुक्याचे असेल. शेवटच्या पाच षटकांत कोण गोलंदाजी करणार याचेही महत्त्व असेल. कारण गेल्या काही टी-२० सामन्यांत अखेरच्या षटकात खूप जास्त धावांचा मारा गोलंदाजांना महाग पडला होता. कर्णधार रोहित शर्मा अंतिम संघ निवडीच्या दृष्टीने दोन सराव सामन्यांवर बारीक नजर ठेवणार आहे.

आजची सराव लढत

  • ऑस्ट्रेलिया - भारत

  • सकाळी ८.३० वाजता