टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने मुंबई मॅरेथॉन जिंकली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई - पाच महिन्यांपूर्वी रिओत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळवणाऱ्या टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने मुंबई जिंकली आणि आजवरच्या 13 स्पर्धांमध्ये राहिलेले केनिया, इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडून काढले. महिलांमध्ये मात्र केनियाच्या बोर्नेस किटूरने बाजी मारली. 

मुंबई - पाच महिन्यांपूर्वी रिओत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळवणाऱ्या टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने मुंबई जिंकली आणि आजवरच्या 13 स्पर्धांमध्ये राहिलेले केनिया, इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडून काढले. महिलांमध्ये मात्र केनियाच्या बोर्नेस किटूरने बाजी मारली. 

रिओ ऑलिंपिकमध्ये जगभरातील नावाजलेल्या धावपटूंसह धावण्याच्या अनुभवाचा फायदा सिम्बूला मिळाला. मॅरेथॉनमधले हे त्याचे पहिलेच विजेतेपद आहे. त्याने विजेतेपदाच्या 42 हजार डॉलरचीही कमाई केली. केनियाच्या जोशूआ किपकोरिरबरोबर त्याची चांगली स्पर्धा झाली. अखेरच्या एक किलोमीटरपर्यंत तो एक पाऊल मागे होता; परंतु अंतिम टप्प्यात त्याने अनुभव पणास लावत 13 सेकंदांनी बाजी मारली. 

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लेवी मेताबो व इथिओपियाच्या सेबोका दिबाबा यांना विजेतेपदासाठी पसंती देण्यात आली होती; परंतु हे दोघेही पहिल्या पाच स्पर्धकांतही आले नाहीत. वातावरणात फरक पडल्यामुळे यंदा स्पर्धा विक्रम होण्याची शक्‍यता कमी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 7.20 मिनिटांनी ही एलिट शर्यत सुरू झाल्यावर प्रथम पेसमेकर आघाडीवर होते. त्यानंतर आघाडीवर असलेल्या जथ्यामध्ये सिम्बू दोन पावले मागेच होता. पेडर रोड येथील पूल आणि चढ हा स्पर्धकांची परीक्षा घेणारा असतो. सिम्बू मुंबईत प्रथम धावत असला तरी त्याचा अंदाज होता यापेक्षा त्याने तसा सराव केला होता. टांझानियामध्येही असे चढ आहेत. मी तसे चढ असलेल्या ठिकाणी सराव केला होता. त्यामुळे मला मुंबईत कठीण गेले नाही, असे त्याने सांगितले. 

परतीच्या मार्गावर अखेरच्या टप्प्यात 10 किलोमीटरची शर्यत सुरू झाली तरी सिम्बू पाठीमागे होता; मात्र अखेरच्या आठ किलोमीटरमरध्ये गिअर बदलल्यावरही तो किपकोरिरपेक्षा एक पाऊल मागे होता. त्याने या वेळी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला गाफील ठेवले आणि अखेरच्या एका किलोमीटरमध्ये वेग वाढवत विजय मिळवला. 

अनुभव केवळ दोन वर्षांचा 
अल्फोन्स सिम्बू याच्याकडे मॅरेथॉनचा अनुभव केवळ दोनच वर्षांचा आहे. 2015 मध्ये झालेल्या जागतिक चॅंपियन्स स्पर्धेत तो पहिल्यांदा सहभागी झाला. त्यानंतर रिओ ऑलिंपिकमध्ये त्याने पाचवे स्थान मिळवले होते. त्याचे वडील फेलिक्‍स हे फुटबॉलपटू आहेत. ऍथलिटचा पाया असल्यामुळे अल्फोन्सने मॅरेथॉन धावपटू व्हायचे ठरवले. 

महिलांमध्ये इथिओपियाच्या दिक्‍नेश मेकाशला मुंबई मॅरेथॉन तिसऱ्यांदा जिंकण्याची संधी होती; परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केनियाच्या बोर्नेस किटूरने सहजच विजय मिळवला. किटूर आणि दुसऱ्या स्थानी आलेल्या चाल्तू ताफा यांच्यात तब्बल चार मिनिटांचा फरक राहिला. एलिट महिला धावपटूंमध्ये ज्योती गवते नववी आली. 

निकाल ः 
एलिट पुरुष ः- 1) अल्फोन्स सिम्बू (टांझानिया, 2.09.32 मि.) 2) जोशुआ किपकोरिर (केनिया, 2.09.50), 3) इल्यूड बॅरेंग्यटूनी (केनिया, 2.10.39), 4) जेकब चेसारी (केनिया, 2.11.36) 5) बोन्सा दिदा (इथिओपिया, 2.11.55). 

एलिट महिला ः- 1) बोर्नेस किटूर (केनिया, 2.29.02), 2) चाल्तू ताफा (इथिओपिया, 2.33.03), 3) तिगिस्ट गिर्मा (इथिओपिया, 2.33.19), 4) मंग्लादेना शारूई (टांझानिया, 2.34.51), 5) दिक्‍नेश मेकाश (इथिओपिया, 2.36.44). 

पूर्ण मॅरेथॉन (भारत, पुरुष) ः- 1) खेता राम (2.19.51), 2) बहाद्दूरसिंग धोनी (2.19.57), 3) टी. एच. संजित (2.21.19), 4) इलाम सिंग (2.21.27), 5) राहुल कुमाल पाल (2.21.43). 

पूर्ण मॅरेथॉन (भारत महिला) ः- 1) ज्योती गवते (2.50.53), 2) शाल्मली सिंग (3.07.41), जिग्मत दोलमा (3.14.38). 

भारत अर्धमॅरेथॉन पुरुष ः- 1) जी. लक्ष्मण (1.05.05), 2) सचिन पाटील (1.06.22), 3) दीपक कुंभार (1.06.28). 

भारत अर्धमॅरेथॉन महिला ः- 1) मोलिका आथरे (1.19.13), 2) मीनाक्षी पाटील (1.20. 53), 3) अनुराग सिंग (1:25:20). 

Web Title: Tanzania's Alphons simbu won the Mumbai Marathon