esakal | IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की

बोलून बातमी शोधा

nitin menon
IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या आयपीएलमधून काही परदेशी आणि देशातील खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यात आता अंपायर्सची भर पडलीये. अंपायर नितीन मेनन यांनी आयपीएलच्या 14 व्या हंगामातून माघार घेतली आहे. मेनन यांची आई आणि पत्नी यांना कोरोनाची लागण झाली असून कुटुंबियांना प्राधान्य देण्यासाठी ते इंदोरच्या आपल्या घरी परतले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन अंपायर पॉल राइफल यांनीही स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्याच्या परिस्थितीत मायदेशी परतण्यास कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.

हेही वाचा: IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेनन यांना एक मुलगा आहे. तो छोटा असून त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना घरी परतावे लागले. त्यांच्या बॅकअपसाठी देशांतर्गत स्तरावर काम करणारे अंपायर्स उपलब्ध आहेत. मेनन ज्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणार होते त्या मॅचमध्ये देशांतर्गत स्तरावर काम केलेले आणि बॅकअप लिस्टमध्ये असणारे अंपायर काम पाहतील. ऑस्ट्रेलियन अंपायर रॉड टकर आयपीएलच्या सामन्यासाठी उपलब्ध राहतील, असा बीसीसीआयला विश्वास होता. पण त्यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. 37 वर्षीय नितिन मेनन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळातील (ICC) एलीट अंपायर पॅनमधील एकमात्र भारतीय आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात आयपीएल स्पर्धेपूर्वी पार पाडलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे विशेष कौतुक झाले होते.

हेही वाचा: IPL 2021 : परदेशी खेळाडू आमची जबाबदारी; BCCI चे भावनिक पत्र

ICC च्या एलीट पॅनलमधील अंपायर राइफल अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. 'हेरॉल्ड' आणि 'द एज' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मायदेशी परतण्यास अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. व्हाया दोहा मार्गे काही लोक ऑस्ट्रेलियाला जात होते. मात्र हा मार्ग आता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरुन जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता स्पर्धा संपल्यानंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. बुधवारी स्पर्धेतून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतल्याचे त्यांना सांगितले.