
IND vs BAN : टीम इंडियाची 'स्पीड गन' संघात परतली! या खेळाडूची घेतली जागा
Bangladesh vs India Umran Malik : भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला आहे. टीम इंडियाला रविवारपासून बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी संघाला मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आता याला दुजोरा दिला आहे. शमीच्या जागी स्पीड गन उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने सांगितले की, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीदरम्यान सराव सत्रात वेगवान गोलंदाज शमीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तो सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला तो मुकणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत उमरान टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात त्याने शानदार गोलंदाजी केली. एकदिवसीय मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत तीन विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत शमी एकदिवसीय मालिकेत भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल.
बांगलादेश दौऱ्यावर भारताला तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका 4 डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.