अभियंता युवकांची अनोखी सायकल रॅली; प्लॅस्टिक मुक्ततेचा दिला संदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे ः प्लॅस्टिकचा होत असलेला वापर टाळण्यासाठी होत असलेल्या जनजागृतीत तमिळनाडूच्या श्रीकांत सुब्रह्मण्यम आणि अरुण सुब्रह्मण्यम या युवकांनी उडी घेत त्यासाठी कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास केला.

पुणे ः प्लॅस्टिकचा होत असलेला वापर टाळण्यासाठी होत असलेल्या जनजागृतीत तमिळनाडूच्या श्रीकांत सुब्रह्मण्यम आणि अरुण सुब्रह्मण्यम या युवकांनी उडी घेत त्यासाठी कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास केला.

श्रीकांत आणि अरुण या युवकांनी 8 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून आपल्या सायकल प्रवासास सुरवात केली. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक राज्यांचा प्रवास करत ते मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाले. महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी पुणे येथे आल्यावर आवर्जुन "सकाळ' कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी "प्लॅस्टिक मुक्त' भारत हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अरुण हा अभियंता असून, आय. टी कंपनीत कामाला आहे, तर श्रीकांत हा बी. टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आपल्याकडे प्लॅस्टिकचा अवास्तव वापर होतो आणि ते नष्ट करण्यासाठी विविध पर्याय असले, तरी ते अजून इतके प्रचलित नाहीत. त्यामुळेच या जनजागृतीसाठी आम्ही या मोहिमेस सुरवात केली, असे अरुणने सांगितले. 

आपल्या प्रवासाबाबत बोलताना अरुण म्हणाला,""एकूण दोन हजार कि.मी. सायकल प्रवास करणार आहोत. उद्या बुधवारी आम्ही मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ आमच्या मोहिमेची सांगता करू. या प्रवासात आम्ही तमिळनाडूतील 5 आणि कर्नाटकातील 3 शहरांना भेटी दिल्या. आता पुणे येथे आलो आहोत. पुण्यात नाही, पण कर्नाटक आणि तमिळनाडूत आम्ही विविध शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कसे नष्ट करता येईल आणि त्याचा वापर कसा टाळता येईल याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर साधारण दोन हजारहून अधिक पत्रकेही वाटली. प्रत्येक ठिकाणी आमच्या उपक्रमाचे स्वागतच झाले.'' 

या दोन भावांमध्ये श्रीकांत हा सायकलपटू असून, राज्यस्तरावर त्याने आतापर्यंत आपली कामगिरी दाखवली आहे. भाऊ अरुणने ही कल्पना मांडल्यावर सहा महिने सराव केल्यानंतरच मोहिमेचा कार्यक्रम आखल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला,""मला सायकलिंगची सवय असली, तरी भावाला नव्हती. त्यामुळे सायकल खरेदीपासून ते प्रवासात लागणाऱ्या सर्व साहित्याची जुळवाजुळव करण्यात आमचे काही दिवस गेले. सहाजिकच सरावाशिवाय हे शक्‍य नव्हते. त्यामुळे सहा महिने सराव करूनच मोहिमेला सुरवात केली.'' 

बारा दिवसात गाठले उद्दिष्ट 
या रॅलीत आम्ही रोज सकाळी 6.30 वा. सुरवात करून साधारण नऊ तास आम्ही सायकलिंग करत होतो. काही वेळा रात्रीचा प्रवास करावा लागला. त्यामुळे आम्ही 12 दिवसात हे 2 हजार कि.मी.चे अंतर गाठू शकलो. या वेळेची नोंद इंडियन बुक्‍स ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. 

असा दिला संदेश 
प्लॅस्टिकचा वापर वाढतोय. पण, त्याचा वापर काळजीपूर्वक करा. ते नष्ट करताना काळजी घ्या, पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही याकडे जरुर लक्ष द्या, तरच तुमचे आणि आपले आयुष्य दिर्घायु होईल, असा संदेश त्यांनी आपल्या या रॅलीमधून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A unique bicycle rally of youth