संजीवनीची सुवर्णपदकासह विक्रमाचीही हॅट्ट्रिक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नागपूर - आशियाई ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिककर संजीवनी जाधवने कोईम्बतूरच्या नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या 77 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याचप्रमाणे तिने सलग तिन्ही स्पर्धांत स्पर्धाविक्रम नोंदविण्याचा विक्रम केला. तिचा सरावातील सहकारी किसन तडवीने पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्ण, तर महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सायली वाघमारेने रौप्यपदक जिंकले. 

दोन वर्षांपूर्वी मुडबद्री (मंगलोर) येथे सर्वप्रथम संजीवनीने पाच व दहा हजार मीटर शर्यतीत विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. गेल्यावर्षी पतियाळा येथेही तिने पहिल्या वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती. दोन वर्षांपूर्वी कोरियात झालेल्या विश्‍व विद्यापीठ स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहावे स्थान मिळविणाऱ्या 20 वर्षीय संजीवनीने येथे 15 मिनिटे 59.17 सेकंदांत शर्यत पूर्ण करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. पहिल्या वर्षी तिने 16 मिनिटे 36.45 सेकंद, तर गतवर्षी तिने 16 मिनिटे 18.01 सेकंदाचा विक्रम केला होता. 

आशियाई युवा विजेता किसन तडवीने पुणे विद्यापीठाला दुसरे सुवर्ण मिळवून देताना पाच हजार मीटर शर्यत 14 मिनिटे 37.47 सेकंद या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह जिंकली. महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सायली वाघमारेचे सुवर्णपदक अवघ्या काही शतांश सेकंदाने हुकले. या शर्यतीत 795 मीटरपर्यंत सायली आघाडीवर होती. अंतिम क्षणी गत स्पर्धेतील ब्रॉंझपदकविजेत्या मद्रास विद्यापीठाच्या के. प्रियाने सायलीवर मात करून 2 मिनिटे 13.31 सेकंदात सुवर्ण, तर सायलीने 2 मिनिटे 13.56 सेकंदात रौप्यपदक जिंकले. हे सायलीचे आंतरविद्यापीठ स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक होय. गतविजेत्या लखनऊच्या विजयालक्ष्मीला ब्रॉंझपदक मिळाले.

Web Title: university athletics