तीव्र वेदनांमुळे जगज्जेता कोसळला..उठला..लंगडला..जिंकला!!

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑगस्ट 2017

असह्य वेदना सहन करीतही बोल्ट पुन्हा एकदा उठला; आणि त्याने लंगडत उर्वरित 30 मीटर पूर्ण केले. जागतिक स्तरावर आत्तापर्यंत 19 सुवर्णपदके जिंकलेल्या बोल्ट याने अखेरची स्पर्धाही अर्धवट सोडली नाही

लंडन - लंडन येथील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत धावताना जमैकाचा वेगवान धावपटू व जगातील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्ट याच्या स्वप्नवत कारकिर्दीची अखेर नाट्यमय व तितकीच करुण झाली.

400 मीटर रिले स्पर्धेत अखेरचा "लेग' धावताना अचानक बोल्ट याच्या डाव्या पायात तीव्र कळा आल्याने तो थांबला. मात्र तीव्र कळा येत असतानाही त्याने लंगडावयास सुरुवात केली. काहीच मीटर ओलांडल्यानंतर हा जगज्जेता खेळाडू असह्य वेदनांनी अक्षरश: खाली कोसळला.

या स्पर्धेचे विजेतेपद ब्रिटनने मिळविले असताना ट्रॅकवर जागीच कोसळलेल्या बोल्ट याला तत्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी तज्ज्ञांचे पथक धावून आले. मात्र असह्य वेदना सहन करीतही बोल्ट पुन्हा एकदा उठला; आणि त्याने लंगडत उर्वरित 30 मीटर पूर्ण केले. जागतिक स्तरावर आत्तापर्यंत 19 सुवर्णपदके जिंकलेल्या बोल्ट याने अखेरची स्पर्धाही अर्धवट सोडली नाही. स्पर्धेच्या औपचारिक निकालानुसार जमैकाने ही स्पर्धा पूर्ण केली नसली; तरी बोल्ट याच्या या असामान्य कृतीने त्याच्या कारकिर्दीसहच जागतिक ऍथलेटिक्‍सच्या इतिहासातील एक सुवर्णपान लिहून पूर्ण झाले!

कारकिर्दीतील अखेरच्या स्पर्धेत धावलेल्या बोल्ट याच्यावर इतर खेळाडूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Usain Bolt collapses in final race