उत्कर्षने पुण्याचे खाते उघडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

65 किलो वजनी गटात पटकावले सुवर्ण

पुणे :  राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 60व्या अधिवेशनाला पुण्याच्या मल्लांनी झोकात सुरवात केली. पहिल्याच दिवशी गादी विभागात पुण्याच्या उत्कर्ष काळे याने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर इंदापूरच्या सागर मारकडने चीतपट निकाल नोंदवताना मातीत 57 किलो वजनी गटात सुवर्णयश मिळविले.
वारजे येथे ही स्पर्धा सुरू असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुण्याच्या मल्लांनी वर्चस्व राखले. गादी विभागात आंतरराष्ट्रीय मल्ल असणाऱ्या उत्कर्ष काळे याने प्रतिस्पर्धी पुणे जिल्हा संघाच्या सागर लोखंडे याला वर्चस्व मिळविण्याची संधीच दिली नाही.

अत्यंत हुशारीने नियंत्रित कुस्ती करून त्याने प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळविण्याचे तंत्र अचूक राबवले आणि पहिल्या फेरीत 4-2 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत सागर प्रतिकार करेल अशी अपेक्षा उत्कर्षने फोल ठरवली. अनुभव पणाला लावताना त्याने पुन्हा एकदा सागरचा ताबा मिळवून दोन गुणांची वसुली केली आणि गुणांवरच विजय मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

माती विभागातील 57 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदापूरच्या सागर मारकड याने निकाली कुस्ती करत उपस्थितांची वाहवा मिळविली. घरच्याच मारकड कुस्ती केंद्रात वडील मारुती मारकड यांच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्या सागरने वेगवान कुस्ती करताना सोलापूरच्या जोतिबा अटकळे याला अवघ्या चौथ्या मिनिटाला कलाजंग डावावर आस्मान दाखवले.

दरम्यान, आज दुपारच्या सत्रात डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, किरण भगत, समाधान पाटील, सचिन येलभर, सागर बिराजदार, अभिजित कटके या "केसरी' गटातील प्रमुख मल्लांनी वजने दिली. सहाजिकच या तगड्या मल्लांच्या सहभागामुळे उद्यापासून पुण्यातील कुस्ती शौकिनांना अधिक कौशल्यपूर्ण लढती बघायला मिळणार, यात शंकाच नाही.

Web Title: Utkarsh account opened in Pune