जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत विनेशला ब्राँझपदक

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आशियाई सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगट हिने जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील ब्रॉंजपदकासह टोकियो-2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर ठरली. दुसरी कुस्तीगीर सीमा बिस्ला मात्र पदक आणि जागतिक पात्रतेपासून दूर राहिली. 

नूर-सुलतान (कझाकस्तान) : आशियाई सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगट हिने जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेतील ब्रॉंजपदकासह टोकियो-2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर ठरली. दुसरी कुस्तीगीर सीमा बिस्ला मात्र पदक आणि जागतिक पात्रतेपासून दूर राहिली. 

Breaking : टोकीयो ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटू विनेश फोगट पात्र

विनेशने 53 किलो वजनी गटातून ही कामगिरी केली. मात्र, 50 किलो वजनी गटातून सीमा बिस्ला पात्रता सिद्ध करण्यात अपयशी ठरली. त्याचबरोबर ऑलिंपिक गट नसलेल्या 59 किलो वजनी गटातून भारताच्या पूजा धांडा हिला विजेतेपदापासून दूर राहावे लागले. ग्रीको-रोमन प्रकारात भारतीय पुरुष मल्ल अपयशी ठरत असताना महिला गटात विनेश फोगट हिने जागतिक स्पर्धेतील भारताचे पदकाचे खाते उघडले. आता पूजा धांडा उद्या ब्रॉंझपदकाची लढत खेळणार आहे. 

सफाईदार विजय 
साखळी फेरीत हरल्यानंतर प्रतिस्पर्धी मायू हिने अंतिम फेरी गाठल्यामुळे विनेशला रिपेचेजमधून ब्रॉंझसह ऑलिंपिक पात्रतेची संधी होती. तिचा तिने अचूक फायदा उठवला. रिपेचेजमध्ये पहिल्या लढतीत तिने जागतिक ब्रॉंझपदक विजेत्या युक्रेनच्या युलिया खाल्वाज्‌झी हिचा 5-0 असा सहज पराभव केला. त्यानंतर जागतिक रौप्यपदक विजेत्या साराह हिल्डेब्रॅंड्‌ट हिला 8-2 असे हरवून ब्रॉंझपदकाच्या लढतीत प्रवेश केला. विनेशने नंतर संध्याकाळच्या सत्रात ग्रीसच्या मारिया प्रेव्होलाराकी हिचा 4-1 असा पराभव करून जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले. या तीनही लढतीत विनेशने आपल्या लौकिकास साजेसा असा खेळ करताना आक्रमक कुस्तीचे सुरेख प्रदर्शन केले. त्याचबरोबर चपळता राखून प्रतिस्पर्धीला सतत दडपणाखाली ठेवत अचूक नियोजनही दाखवून दिले. 

दुर्दैवी सीमा 
भारताची दुसरी कुस्तीगीर सीमा बिस्ला मात्र पात्रतेपासून दूर राहिली. तिने रिपेचेजच्या पहिल्या फेरीत नायजेरियाच्या मिएसिनेई मर्सी जेनेसिस हिला पराभूत केले. संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत 9-9 अशी बरोबरी झाली होती. मात्र, अखेरचा गुण सीमाने मिळविल्यामुळे तिला नियमानुसार विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र सीमाला रशियाच्या एकटेरिना पोलेश्‍चुक हिच्याकडून तांत्रिक गुणांवर 11-1 अशी हार मानावी लागली. 

पूजा अपयशी 
जागतिक विजेतेपदाचे पूजाचे स्वप्नही आज भंग पावले. पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या कॅटसेनिरा यानुशकेविच हिला एकतर्फी लढतीत 12-2 असे हरवल्यावर तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या युझुका इनागकी हिचे आव्हान तितक्‍याच सहज 11-8 असे संपुष्टात आणले. मात्र, उपांत्य फेरीत तिला ही आक्रमकता रशियाच्या लियुबोव ओवचारोवा हिच्याविरुद्ध राखता आली नाही. लियुबोवने वेगावन कुस्ती करताना पूजाला प्रतिआक्रमणाची संधीच दिली नाही आणि 7-0 अशा विजयासह अंतिम फेरी गाठली. पूजाला आता ब्रॉंझपदकाची संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinesh Phogat wins Bronze medal in world wrestling championship