Virat Kohli : 1214 दिवसांनंतर दुष्काळ संपला! मोडला रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli : 1214 दिवसांनंतर दुष्काळ संपला! मोडला रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 1214 दिवसांनंतर शतक झळकावले आहे. त्याने शनिवारी 10 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना हे शतक झळकावले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीने 54 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर तो दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला साथ देताना दिसला. 85 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक पूर्ण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 72 वे शतक ठरले. यासह एकूण 71 आंतरराष्ट्रीय शतके करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आता मागे टाकले आहे.

भारतीय दिग्गज खेळाडूने वनडे क्रिकेटमध्ये 3 वर्षांनंतर प्रथमच शतकाचा टप्पा गाठला. विराटने शेवटच्या वेळी ऑगस्ट 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शतक झळकावले होते. तेव्हापासून, त्याने अनेक अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत आणि तीन वेळा 80 च्या वर धावा केल्यानंतर तो बाद झाला आहे. विराटने अखेर 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले.

बांगलादेशविरुद्ध शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत पॉन्टिंगला मागे सोडले आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विश्वविक्रम भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या दिग्गज खेळाडूने 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामन्यांसह 664 सामन्यांमध्ये एकूण 100 शतके झळकावली आहेत. 481 सामन्यांनंतर विराटकडे आता 44 वनडे, 27 कसोटी आणि 1 टी-20 शतकांसह एकूण 72 शतके आहेत, तर पाँटिंगने 560 सामन्यांमध्ये 71 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.