प्रशिक्षकाबाबत कोहलीने फक्त आपले मत मांडले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी आवडता प्रशिक्षक कोण अशी विचारणा झाल्यावर कोहलीने शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आवडेल असे मत माडंले होते. त्या वेळी कोहलीने शिष्टाचार मोडल्याची टिका केली गेली.

नवी दिल्ली - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री राहिल्यास आवडेल या कर्णधार विराट कोहलीच्या मतप्रदर्शनास प्रशासक समितीने याला प्रत्येकास मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत कोहलीने शिष्टाचार मोडल्याच्या टिकेस उत्तर दिले. 

विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी आवडता प्रशिक्षक कोण अशी विचारणा झाल्यावर कोहलीने शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आवडेल असे मत माडंले होते. त्या वेळी कोहलीने शिष्टाचार मोडल्याची टिका केली गेली. प्रशिक्षक निवडीसाठी समितीची निवड करण्यात आली तेव्हा प्रशासक समितीने कर्णधाराला या निवडीपासून दूर ठेवले होते. मात्र, त्यानंतरही त्याने मत मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

मात्र, प्रशासक समितीने लोकशाही असलेल्या देशाचा विराट नागरिक आहे. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगून त्याची पाठराण केली. या समितीमधील एक सदस्य म्हणाला,""कोहलीला पत्रकार परिषदेत वारंवार प्रशिक्षकाविषयी प्रश्‍न विचारण्यात आले. तेव्हा त्याने उत्तर देताना केवळ आपले मत मांडले आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य येथे प्रत्येकाला आहे. आज प्रत्येक जण प्रशिक्षकाच्या निवडीविषयी मत मांडत आहेत. मग, कोहलीने शिष्टाचार मोडला असे कसे म्हणू शकतो ?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat kohli expressed his opinion about the coach