
एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर विराट आणखी काय म्हणाला, वाचा सविस्तर...
"आपलं नातं क्रिकेट पलिकडलं"; विराटची ABD साठी भावनिक प्रतिक्रिया
AB De Villiers Retires : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होतीच पण आज त्याने IPL आणि इतर स्पर्धात्मक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. 'क्रिकेटमधील माझा प्रवास खूपच छान होता. पण आता मी वयाच्या ३७व्या वर्षी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. माझा मित्र विराट कोहली याचे मी आभार मानतो', असं ट्वीट करून त्याने घोषणा केली. त्याच्या निवृत्तीवर विराटने पहिली प्रतिक्रिया दिली.

AB-De-Villiers-RCB
डिव्हिलियर्स म्हणजे मी आतापर्यंत भेटलेल्या सर्व लोकांपैकी आमच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वांना नेहमी प्रोत्साहन देणारा खेळाडू आहे. तू क्रिकेटमध्ये जी उंची गाठली आहेस त्याचा तुला नक्कीच अभिमान वाटेल. त्यासोबतच RCB साठी तू जे काही केलंस त्याचाही आम्हाला गर्व आहे. आपलं नातं हे खेळापलिकडचं आहे. मी कायमच तुझ्यासोबत असेन. तुझा निवृत्तीचा निर्णय मनाला पटणारा नाही. पण तुझ्या कुटुंबासाठी आणि स्वत:साठी घेतलेला हा एक योग्य निर्णय आहे. खूप सारं प्रेम!", असं ट्वीट करत विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या.
"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना मला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला. ११ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही. कटू-गोड आठवणींचा ठेवा सोबत घेऊन मी क्रिकेटचा निरोप घेत आहे. निवृत्तीचा निर्णय घेणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवण्यासाठी मी अखेर निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. मी RCB च्या संघ व्यवस्थापनाचे, माझा मित्र विराट कोहलीचे आणि साऱ्यांचे आभार मानतो", अशा शब्दांत डिव्हिलियर्सने आपल्या भावना व्यक्त केल्या.