
भारतात एबी डिव्हिलियर्सचा खूप मोठी चाहतावर्ग
ABD ने शेवटच्या क्रिकेट सामन्यात किती रन्स केल्या माहितीये?
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आज त्याने IPL आणि इतर स्पर्धात्मक क्रिकेटलाही रामराम ठोकला. 'क्रिकेटमधील माझा प्रवास खूपच छान होता. पण आता मी वयाच्या ३७व्या वर्षी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मी कुटुंबाला अधिक वेळ देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे', असं त्याने ट्वीट करून सांगितलं. डिव्हिलियर्स जेव्हा IPL मध्ये सामना खेळला तेव्हा त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा नव्हती. पण आजच्या घोषणेनंतर IPL मधील सामना हाच त्याचा शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना ठरल्याचं निश्चित झालं. या सामन्यात त्याने किती धावा केल्या जाणून घेऊया.
IPL 2021मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB च्या संघाने प्ले-ऑफ्समध्ये धडक मारली होती. पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांनी कोलकाताच्या संघाकडून पराभूत व्हावं लागलं. हाच सामना एबी डिव्हिलियर्सचा शेवटचा स्पर्धात्मक सामना ठरला. ११ ऑक्टोबर २०२१ ला खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या होत्या. तर कोलकाताने ते आव्हान २ चेंडू राखून पार केले होते. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स पाचव्या क्रमांकावर विराट बाद झाल्यानंतर फलंदाजीस उतरला होता. पण त्याला ९ चेंडूत ११ धावा करता आल्या. त्याने केवळ १ चौकार लगावला. अनुभवी विंडिज फिरकीपटू सुनील नारायणने त्याला त्रिफळाचीत करत माघारी धाडले होते.
सुनील नारायणने काढला होता डिव्हिलियर्सचा क्लीन बोल्ड-
निवृत्तीच्या वेळी डिव्हिलियर्सने व्यक्त केलेल्या भावना...
"रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना मला क्रिकेटचा मनसोक्त आनंद घेता आला. ११ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही. कटू-गोड आठवणींचा ठेवा सोबत घेऊन मी क्रिकेटचा निरोप घेत आहे. निवृत्तीचा निर्णय घेणं हे माझ्यासाठी नवीन नसलं तरी कठीण होतं. पण माझ्या कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवण्यासाठी मी अखेर निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. मी RCB च्या संघ व्यवस्थापनाचे, माझा मित्र विराट कोहलीचे आणि साऱ्यांचे आभार मानतो", असं डिव्हिलियर्सने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले.