ICC Test Rankings : 'किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला 'टॉपर'!

IND-Virat-Kohli
IND-Virat-Kohli

दुबई : बांगलादेशविरुद्ध पाडलेला धावांचा पाऊस आणि त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे पाकिस्तानविरुद्धचे अपयश, यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा मानाचे शिखर गाठले आहे. फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत तो पुन्हा एकदा नंबर एकचा फलंदाज झाला आहे. 

ईडन गार्डनवर झालेल्या भारताच्या पहिल्या वहिल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात विराट कोहलीने 136 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याच्या खात्यात 928 गुण जमा झाले; तर ऍडलेड येथील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मिथला केवळ 36 धावाच करता आल्या. परिणामी त्याच्या खात्यात 923 गुण झाले. त्यामुळे विराटने पाच गुणांसह आघाडी घेतली. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना सुरू होण्याअगोदर स्मिथकडे 931 गुण होते. 

स्पर्धा सुरूच राहणार 

विराटने पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतलेली असली तरी स्मिथबरोबरची त्याची स्पर्धा कायम राहणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामन्यांची मालिका 12 डिसेंबरपासून सुरू होत आहे; तर भारतीय संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

नोव्हेंबरमधील कामगिरीवरून आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली; त्यानुसार चेतेश्‍वर पुजाराने आपला चौथा क्रमांक कायम ठेवला, तर अजिंक्‍य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली. तो आता सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध 335 धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने थेट 12 क्रमांकाने प्रगती केली आहे. त्यामुळे तो थेट पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. 

न्यूझीलंडमध्ये इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने द्विशतकी खेळी केली होती, त्याचा त्याला क्रमांक सुधारण्यात फायदा झाला. तो सातव्या स्थानावर आला आहे. एकूणच टॉप टेन फलंदाजांमध्ये विराट, पुजारा आणि रहाणे असे तीन भारतीय आहेत. स्मिथ, वॉर्नर, लॅबुशेन असे तीन ऑस्ट्रेलियन आहेत. 

गोलंदाजीत जसप्रित बुमराने पाचवा क्रमांक कायम ठेवला आहे; तर आर. अश्‍विन नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची दाणादाण उडवताना भेदक मारा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने गोलंदाजीतील आपले पहिले स्थान भक्कम केले आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडाही दुसऱ्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजीतही टॉप टेनमध्ये बुमरा, अश्‍विन आणि महम्मद शमी (10) असे तिघे जण आहेत. 

अष्टपैलूंच्या क्रमवारीत जेसन होल्डर पहिला; तर भारताचा रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सचा क्रमांक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com