कोहलीच्या शतकानंतर कसोटी रंगतदार अवस्थेत...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

आश्‍विन-विराट जोडीने भारतास अडीचशेचा टप्पा पार करुन दिला. आश्‍विन याचा व्हर्नॉन फिलॅंडर याच्या गोलंदाजीवर कर्णधार फाफ डुप्लेसिस याने अप्रतिम झेल टिपत भारतास धक्का दिला. आश्‍विननंतर फलंदाजीस आलेले फलंदाज कोहलीस अपेक्षित साथ न देऊ शकल्याने भारताचा डाव 307 धावांत संपुष्टात आला

सेंच्युरियन - भारत व दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना आज (सोमवार) रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. भारताचा डाव 307 धावांत संपुष्टात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने अवघ्या तीन धावांत दोन बळी गमावले आहेत. जसप्रीत बुमराह याने मकराम (1 धाव - 8 चेंडू) व आमला (1 धाव - 10 चेंडू) या दोन्ही आफ्रिकन फलंदाजांना पायचीत केले. 

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या तेजतर्रार गोलंदाजीचा सहजी सामना करताना भारतीय कर्णधार विराट कोहली (153 धावा - 217 चेंडू) याने केलेल्या अविस्मरणीय खेळीनंतर आज भारताचा डाव 92.1 षटकांनंतर 307 धावांत संपुष्टात आला. यामुळे दक्षिण आफ्रिकेस 28 धावांची आघाडी मिळाली आहे.

काल नाबाद असलेल्या कोहली व हार्दिक पांड्या (15 धावा - 45 चेंडू) या भारतीय जोडीने आज फलंदाजीस प्रारंभ केला. मात्र काही वेळांतच पांड्या अत्यंत हलगर्जीपणाने धावबाद झाला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सोडून दिल्यानंतर क्रीझमध्ये परतताना पांड्याने बॅट वा पाय दोन्ही क्रीझमध्ये न टेकविल्याने तो धावबाद झाला. बॉल यष्टींना धडकताना त्याची बॅट व पाय दोन्ही क्रीझच्या हद्दीतच असल्याचे स्पष्ट दिसत होते.

पांड्या अपेक्षाभंग करुन बाद झाल्यानंतर आलेल्या रवीचंद्रन आश्‍विन (38 धावा - 54 चेंडू) याने कर्णधारास योग्य साथ देत 71 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आश्‍विन याची परीक्षा पाहत त्याच्यावर वेगवान उसळत्या चेंडूंचा मारा केला. मात्र आश्‍विन-विराट जोडीने भारतास अडीचशेचा टप्पा पार करुन दिला. आश्‍विन याचा व्हर्नॉन फिलॅंडर याच्या गोलंदाजीवर कर्णधार फाफ डुप्लेसिस याने अप्रतिम झेल टिपत भारतास धक्का दिला. आश्‍विननंतर फलंदाजीस आलेले फलंदाज कोहलीस अपेक्षित साथ न देऊ शकल्याने भारताचा डाव 307 धावांत संपुष्टात आला.

28 धावांची आघाडी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु झाली असून, अखेरच्या वृत्तानुसार द. आफ्रिकेच्या 2 बाद 3 धावा झाल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 आघाडीवर असून यामुळे भारतावर हा सामना जिंकण्याचे दडपण असल्याचे मानले जात आहे.

Web Title: virat kohli south africa cricket india