अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील विराटची पहिल्या लढतीतून माघार

अफगाणिस्तानविरुद्ध आज पहिला ट्वेन्टी-२० सामना
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील विराटची पहिल्या लढतीतून माघार

मोहाली : तब्बल १४ महिन्यांनंतर ट्वेन्टी-२० प्रकारात खेळणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली आजपासून (दि. ११) सुरू होत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील प्रमुख आकर्षण असतील; परंतु उद्या होणाऱ्या पहिल्या सामन्यातून विराटने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. अफगाणिस्तानचा विख्यात लेगस्पिनर रशीद खान दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही.

जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारताची ही अखेरची मालिका आहे. त्यामुळे भारतीय संघाला रचना तयार करण्याची ही अखेरची संधी असली, तरी आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेऊन अंतिम १५ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. गत वेळेस झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर रोहित आणि विराट टी-२० सामने खेळलेले नाहीत. आता हे दोघेही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेचा भाग असल्यामुळे टी-२० रचनेमध्ये त्यांनी पुनरागमन केले आहे; तरीही नवोदित खेळाडू आपली क्षमता सिद्ध करत असल्यामुळे रोहित-विराट यांना आपली उपयुक्तता दाखवावी लागणार आहे.

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला होता. त्याच्या बेधडक फलंदाजीमुळे भारताला दमदार सुरुवात करता येत होती. अफगाणिस्तानविरुद्धच्याही मालिकेत रोहित शर्मा आपला तोच पवित्रा कायम ठेवणार, हे निश्चित आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार असे वेगवान गोलंदाज असतील; तर फिरकीत कुलदीप यादवला प्राधान्य असेल. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा असेल.

संघ यातून निवडणार : भारतः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झादरान (कर्णधार), रेहमतुल्ला गुरबाझ, इकराम अखिली, हझरतुल्ला झाझाई, रेहमत शाह, नजिबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करिम जनत, अझमतुल्ला ओमझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रेहमान, फझलक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नईब.

रोहित-यशस्वी सलामीला

यशस्वी जयस्वाल रोहित शर्माचा सलामीचा साथीदार असेल. उद्याच्या सामन्यात विराट कोहली अनुपलब्ध असल्यामुळे मधल्या फळीत भक्कमपणा आणण्यासाठी गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, हे निश्चित आहे. त्यानंतर तिलक वर्मा आणि रिंकू सिंग अशी क्रमवारी असू शकेल. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात चुरस असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com