Virender Sehwag : सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नाही तर पाकचा 'हा' फलंदाज करणार सर्वाधिक धावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag T20 World Cup Prediction

Virender Sehwag : सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नाही तर पाकचा 'हा' फलंदाज करणार सर्वाधिक धावा

Virender Sehwag T20 World Cup Prediction : ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपला 16 ऑक्टोबर पासून सुरूवात झाली आहे. मात्र खऱ्या अर्थाने टी 20 वर्ल्डकप हा 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सुपर 12 चा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड याच्यात खेळवला जाणार आहे. भारत आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान, क्रिकेट वर्तुळात कोणत्या संघात फायनल होणार? सेमी फायनलला कोणता संघ जाणार याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Denmark Open Super 750 : लक्ष्य सेनने भारताच्याच प्रणॉयचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा कोण करणार असे विचारल्यावर भारतीय फलंदाजाचे नाव न घेता पाकिस्तानच्या फलंदाजाचे नाव घेतला. क्रिकबझशी बोलताना विरेंद्र सेहवाग म्हणाला की, 'पाकिस्तानचा बाबर आझम दमदार फलंदाजी करत आहे. त्याला फलंदाजी करताना पाहून छान वाटतं. जसं आपल्याला विराट कोहली फलंदाजी करताना आत्मिक शांततेची अनुभूती होते. तसंच बाबर आझमला फलंदाजी करताना पाहून आपल्याला आनंद होतो.'

तसंही विरेंद्र सेहवागची भविष्यवाणी सहसा अचूक ठरते. मध्यंतरी आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दिविषयी बोलताना ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर म्हणाला होता की, सेहवागने वॉर्नर कसोटीत चांगला यशस्वी होईल असे भाकित केले होते. आयपीएलमध्ये सेहवागच्या नेतृत्वाखाली खेळताना डेव्हिड वॉर्नरला सेहवागने तू कसोटीत यशस्वी होणार असे सांगितले होते.

हेही वाचा: IND vs PAK : सामन्यापूर्वीच पंतने पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीला जागा दाखवून दिली

वॉर्नर म्हणाला होती की, 'ज्यावेळी मी दिल्लीत गेलो होतो त्यावेळी सेहवागने मला एक - दोनदा पाहिले आणि मला म्हणाला की तू टी 20 पेक्षा कसोटी खेळाडू म्हणून जास्त चांगला ठरशील. यावर मी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो की, मी अजून प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळलेलो नाही. मात्र त्याने सांगितले की जरी सर्व खेळाडू तुझ्या जवळ लावलेले असले तरी जर चेंडू तुझ्या रेंजमध्ये आला तर तू तो चांगल्या प्रकारे टोलवू शकतोस. जर तू सेट झालास तर तुझ्याकडे धावा वसूल करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुम्हाला कायम चांगला चेंडू खेळून काढत खराब चेंडूवर धावा वसूल करायच्या असतात.'