INDW vs SLW : भारतीय माऱ्यासमोर लंकेची उडाली भंबेरी; अंतिम सामन्यात फक्त 65 धावांचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Asia Cup 2022 Final India Restrict Sri Lanka On 65 Runs

INDW vs SLW : भारतीय माऱ्यासमोर लंकेची उडाली भंबेरी; अंतिम सामन्यात फक्त 65 धावांचे आव्हान

Women's Asia Cup T20 2022 India Women vs Sri Lanka Women : भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 20 षटकात 9 बाद 65 धावात रोखत अंतिम सामन्यावर आपली पकड मजबूत केली. भारताकडून रेणुका सिंहने 3 षटकात 5 धावा देत 3 बळी टिपले. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: T20 World Cup : सर्व कर्णधारांनी मिळून अश्विनची केली गोची; भारतीय कर्णधार काय करणार?

श्रीलंकेसाठी रेणुका सिंह टाकत असलेले चौथे षटक एक वाईट स्वप्नासारखे ठरले. या षटकात लंकेने तब्बल तीन विकेट्स गमावल्या. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली 1 धावेवर बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी 2 धावांची भर घालून धावबाद झाली. रेणुकाने पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था बिनबाद 8 वरून 4 बाद 9 अशी केली. यानंतर रेणुकाने सहाव्या षटकात कविशा दिलहारीचा 1 धावेवर त्रिफळा उडवला. यामुळे लंकेची अवस्था 5 बाद 16 धावा अशी झाली.

यानंतर राजेश्वरी गायकवाडने लंकेला अजून खोलात नेले. तिने निलाक्षी डिसेल्वाला 6 धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला. या बरोबरच मलिशा शेहानीला स्नेह राणाने शुन्यावर बाद करत श्रीलंकेची अवस्था 7 बाद 25 धावा अशी केली. लंकेचा संघ आशियाकपच्या अंतिम सामन्यात 50 धावांपार्यंत तरी मजल मारतो का नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा: Babar Azam Birthday : बाबरचा बर्थडे झाला खास; सेलिब्रेशनला 16 कर्णधारांची लाभली साथ!

दरम्यान, स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड या दोघींनी लंकेच्या शेपटाला फारशी वळवळ करू दिली नाही. या दोघींनी लंकेची अवस्था 9 बाद 43 धावा अशी केली. लंकेची शेवटची जोडी इनोका आणि अचिनी यांनी लंकेला कसेबसे अर्धशतक पार करून दिले. विशेष म्हणजे या दोघींना शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत लंकेचा ऑल आऊट होऊ दिला नाही. इनोकाने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले.