Womens Asia Cup 2022 : महिला आशियाई टी-20 चा बांगलादेशात आजपासून थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womens Asia Cup 2022

Womens Asia Cup 2022 : महिला आशियाई टी-20 चा बांगलादेशात आजपासून थरार

Womens Asia Cup 2022 : महिला आशियाई टी-२० करंडकाचा थरार उद्यापासून बांगलादेशमध्ये रंगणार आहे. बांगलादेशमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या लढती रंगणार असून सात देशांमध्ये अजिंक्यपदाची स्पर्धा असणार आहे. सर्वाधिक सहा वेळा या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या भारतीय महिला संघासमोर उद्या होणाऱ्या सलामीच्या लढतीत श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. भारत-पाकिस्तान ही बहुप्रतिक्षित लढत ७ ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा: Irani Cup 2022 : आजपासून इराणी करंडकाला सुरुवात; सर्वांच्या नजरा चेतेश्वर पुजारावर

भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या आशियाई करंडकात घवघवीत यश संपादन केले आहे. आशियाई करंडक पहिल्या चार मोसमात एकदिवसीय प्रकारात खेळवण्यात आला. त्यानंतर अखेरच्या तीन मोसमात टी-२० प्रकारात ही प्रतिष्ठेची स्पर्धा खेळवण्यात आली. भारतीय संघाने पहिल्या चार आणि नंतर दोन अशा एकूण सहा वेळा या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली आहे

भारतीय संघाला गेल्या काही आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडला हरवण्याची करामत करून दाखवली. आता हाच फॉर्म कायम ठेवत आशियाई करंडक सातव्यांदा जिंकण्यासाठी हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ प्रयत्न करताना दिसेल.

हेही वाचा: Jasprit Bumrah : टीम इंडियासाठी खुशखबर; बुमराह T20 World Cup खेळणार!

कर्णधार हरमनप्रीत कौर व स्मृती मंधना यांच्या खांद्यावर भारतीय फलंदाजीची मदार असणार आहे. जेमिमा रॉड्रिग्सचे पुनरागमन होणार आहे. जेमिमासह शफाली वर्मा, एस. मेघना व दयालन हेमलता यांनाही आपली चुणूक दाखवावी लागणार आहे. तसेच रेणुका सिंग, राधा यादव, राजेश्‍वरी गायकवाड व दीप्ती शर्मा यांना गोलंदाजीत ठसा उमटवावा लागेल.

हरमनप्रीत कौर हिने सलामीच्या लढतीच्या पूर्वसंध्येला आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आशियाई करंडकामधून आम्ही पुढल्या वर्षी होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकाची तयारी करणार आहोत. फलंदाजांना वेगवेगळ्या क्रमावर फलंदाजी करायला पाठवणार आहोत.