महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बदलले

पीटीआय
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धा काही आठवड्यांवर असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्यात आले आहेत. पूर्णिमा राव यांच्याऐवजी बडोद्याचे माजी रणजीपटू तुषार आरोठे यांची संघाच्या मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धा काही आठवड्यांवर असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्यात आले आहेत. पूर्णिमा राव यांच्याऐवजी बडोद्याचे माजी रणजीपटू तुषार आरोठे यांची संघाच्या मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली आहे.

विश्‍वकरंडक महिला स्पर्धा जून, जुलैत होणार आहे. या संघाचे एका आठवड्याचे सराव शिबिर सध्या मुंबईत सुरू आहे. आरोठे या शिबिरात तातडीने दाखल होतील. ‘महिला संघाचे प्रशिक्षक होण्याबाबत भारतीय मंडळाने विचारणा केली. राष्ट्रीय संघाचा मार्गदर्शक होण्याची संधी कधीही सोडणार नाही. यापूर्वीही या संघास मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे.महिला संघास मार्गदर्शन करताना कोणतेही प्रश्न येणार नाहीत,’ असे आरोठे यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

आरोठे २००८ ते २०१२ दरम्यान महिला संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक; तसेच मुख्य प्रशिक्षकही होते. आरोठे म्हणाले, ‘विश्‍वकरंडकासाठी संघास तयार करण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. आपली फलंदाजी, तसेच गोलंदाजी चांगली आहे; पण अव्वल संघांच्या तुलनेत आपण क्षेत्ररक्षण आणि तंदुरुस्तीत कमी पडतो. मुंबईतील शिबिरात यावर भर असेल,’ असे त्यांनी सांगितले. 

मला प्रशिक्षकपदावरून 
का दूर केले, याचे कोणतेही कारण मंडळाने दिलेले नाही. खरे तर त्यांनी मला काही कळवलेले नाही. यश तर मिळत होते. या प्रकारे पदावरून दूर करणे, हे अपमानच आहे.
- पूर्णिमा राव

पूर्णिमा राव यांचे यश
 फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रथम या पदावर नियुक्ती; पण विश्वकरंडक ट्‌वेंटी-२० स्पर्धेत भारत साखळीतच गारद झाल्यावर गच्छंती
 जून २०१५ मध्ये फेरनियुक्ती
 भारताने जानेवारी २०१६ मध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली
 आशिया कप, तसेच विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत भारतास विजेतेपद

Web Title: Women's cricket coach changed