वानखेडेवर महिलांचा "आयपीएल' सामना 

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

22 मे रोजी प्लेऑफच्या दिवशी ही प्रदर्शनी लढत होणार आहे.

नवी दिल्ली, ता. 12 ः आयपीएलच्या धर्तीवर महिलांचीही स्पर्धा खेळवण्याच्या विचाराला मोठी चालना मिळाली आहे. आयपीएलच्या प्लेऑफचा पहिला सामना वानखेडेवर 22 मे रोजी होत आहे. त्याच दिवशी दुपारी महिलांचा प्रदर्शनी सामना खेळवला जाणार आहे. 

आयपीएल प्रशासकीय समितीने या सामन्याला मंजुरी दिली असून, दोन्ही संघांत प्रत्येकी चार परदेशी खेळाडू असतील. सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. त्याचे थेट प्रक्षेपणही होईल. दोन्ही संघांकरिता मिळून 20 भारतीय आणि 10 परदेशी खेळाडूंची निवड होईल. भारतीय संघ राष्ट्रीय निवड समिती जाहीर करेल. पुरुषांचा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असल्यामुळे हा सामना दुपारी होईल, असे प्रशासकीय समितीच्या सदस्या डायन एडल्जी यांनी सांगितले. 

महिलांसाठीही आयपीएलसारखी स्पर्धा खेळवण्याचा विचार बीसीसीआयकडून करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात महिलांची "बिग बॅश' स्पर्धा होते, त्यामुळे बीसीसीआयलाही अशी स्पर्धा घेण्यासाठी दडपण येत आहे. 

महिलांच्या अधिकृत आयपीएल स्पर्धा येत्या दोन वर्षांत सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी आम्ही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मंडळांशी त्यांचे खेळाडू उपलब्ध करून देण्याबाबत संपर्क साधलेला आहे, अशी माहिती प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली. 

Web Title: womens ipl match on wankhede stadium mumbai