
WTT : ऑलिंपिक विजेते सोमवारपासून गोव्यात, शरथ कमल, साथियन, मनिकावर भारताची मदार
World Table Tennis Championships : जागतिक टेबल टेनिस (WTT) स्टार कंटेंडर स्पर्धा येत्या सोमवारपासून (ता. २७) गोव्यात खेळली जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने ऑलिंपिक विजेते मा लाँग व चेन मेंग भारतात प्रथमच खेळतील.
ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये पाच मार्चपर्यंत स्पर्धेची चुरस असेल.
एकेरीत यजमान भारताची मदार दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, साथियन ज्ञानशेखरन, पायस जैन, गोव्याचा वेस्ली दो रोझारियो यांच्यासह मनिका बत्रा हिच्यावर असेल. श्रीजा अकुला व सुहाना सैनी या भारतीय संघातील अन्य महिला खेळाडू आहेत.
स्पर्धेच्या पात्रता फेरीतील लढती २७ व २८ रोजी होतील, तर स्पर्धेची मुख्य फेरी १ ते ५ मार्च या कालावधीत खेळली जाईल. भारतात होणारी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेची टेबल टेनिस स्पर्धा आहे.
स्तुपा स्पोर्टस अॅनालिटिक्स व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ यांच्यातर्फे गोवा सरकार व भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येत आहे.
सध्याचा ऑलिंपिक विजेता मा लाँग याच्याव्यतिरिक्त जागतिक क्रमवारीतील अव्वल फॅन झेनडाँग, वँग चुकिन, तोमोकाझू हारिमोटो, ट्रल्स मारगॅर्थ हे पुरुष एकेरीत, तर जागतिक अव्वल मानांकित सून यिंगशा, ऑलिंपिक विजेती चेन मेंग यांच्यासह पहिल्या पाच क्रमांकावरील महिला टेबल टेनिसपटू स्पर्धेच्या एकेरीत खेळतील.
पुरुष दुहेरीत शरथ कमल व साथियन ज्ञानशेखरन, हरमीत देसाई व मानव ठक्कर, तर महिला दुहेरीत मनिका बत्रा व अर्चना कामत, श्रीजा अकुला व दिया चितळे यांच्यावर भारताची आशा असेल.
मिश्र दुहेरीत मनिका व व साथियन, मानव व अर्चना, सुहाना व वेस्ली यांची जोडी भारतातर्फे खेळेल. पात्रता फेरीत भारतातर्फे पुरुष एकेरीत १३, तर महिला एकेरीत १५ खेळाडू खेळतील.