WPL 2023 : धारावीच्या गल्लीत खेळणारी सिमरन थेट जागतिक क्रिकेटपटूंना भिडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wpl 2023 simran shaikh-from-dharavi-will-play-women-s-premier-league 2023

WPL 2023 : धारावीच्या गल्लीत खेळणारी सिमरन थेट जागतिक क्रिकेटपटूंना भिडणार

मुंबईमध्ये सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीतील तरुणीची महिला प्रीमियर लीगमध्ये निवड झाली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये धारावी झोपडपट्टीत राहणार्‍या तरुणी सिमरन शेखची निवड करण्यात आली. तिला यूपी वॉरियर्सने लिलावावेळी 10 लाखांच्या मूळ किंमतीवर संघात घेतले.

महिला प्रीमियर लीगच्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. 23 दिवस चालणाऱ्या या हंगामात 5 संघांमध्ये 20लीग आणि 2 बाद फेरीचे सामने होणार आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये पहिलाच सामना मुंबई इंडियन आणि गुजरात जायंट्स यांच्यात 7:30 वाजता मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.

धारावीतील झोपडपट्टीत सिमरन शेख क्रिकेट खेळू लागते आणि आता थेट महिला आयपीएलमध्ये निवड झाली. सिमरन शेख हिचा प्रेरणादायी प्रवास थोडक्यात...! धारावीच्या गल्ली क्रिकेटपासून सिमरनच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात झाली. वयाच्या १५ वर्षांपासून तिला क्रिकेटचे वेड लागले त्यानंतर सिमरन मुलींसोबत नव्हे तर मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. गल्ली क्रिकेट खेळता खेळता ती क्रॉस मैदान येथील युनायटेड क्लबशी जोडल्या गेली. संजय साटम यांच्याकडून क्रिकेट किटची मोलाची मदत झाली. त्यानंतर सिमरन शेखला क्रिकेटसाठी लागणारे साहित्य संजय साटमकडून मिळले.

मुस्लिम कुटुंबामध्ये सिमरनचा जन्म झाला. गल्लीतील क्रिकेटमध्ये आणि लेदर चेंडूने खेळले जाणारे मुख्य क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक होता. यासंबधी ती म्हणाली कि, गल्ली क्रिकेट आणि मुख्य क्रिकेट यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे मलाही मान्य आहे. परंतु मला क्रिकेटची आवड होती आणि त्यामुळेच मी सर्वस्व पणाला लावले. क्रिकेट खेळण्याबद्दल घरातील इतर सदस्यांची काय भूमिकेवर ती म्हणते आई घर चालवते. घरात आम्ही चार बहीणी आणि तीन भाऊ. वडील वायरिंगचे काम करतात. दोन बहीणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. तर बाकी सर्व माझ्यापेक्षा लहान आहेत. आई-वडीलांनी मला क्रिकेट खेळायला कधीच अडवलं नाही. मला कुठलाही विरोध केला नाही. त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास चांगला झाला.

शिक्षणाबद्दल सांगताना सिमरन म्हणते की,‘मला शिक्षणात कधी फारसा रस नव्हता. त्यामुळे मी दहावीच्या परीक्षेत नापास झाले होते. त्यानंतर मी पुन्हा शिकण्याचा प्रयत्न केला नाही आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं ठरवलं. मुंबईच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये खेळण्याचा मला अनुभव मिळाला. मी १९ वर्षांखालील क्रिकेटही खेळले. मुंबईच्या वरिष्ठ संघातूनही खेळण्याची मला संधी मिळाली. मी फलंदाज आहे. मधल्या फळीत फलंदाजी करायला मला आवडते.

तर मी स्वतःच्या इच्छाशक्तीवर आतापर्यंत पुढे आले आहे. यापुढेही मी प्रयत्नांची पराकष्टा करणार आहे. मला विराट कोहलीची फलंदाजी खूप आवडते. तर महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीचा खेळ मला आवडतो. भारतीय महिला संघातील जेमिमा रॉड्रिग्ज हिचा खेळ आवडतो. प्रयत्नांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माणसाला हवं ते मिळवता येते हे तिने दाखवू दिले आहे.'