कुस्तीपटूंची जालन्यात मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

 आझाद मैदानावर आज उद्‌घाटन सोहळा
 राज्यभरातून ४४ संघ दाखल
 मल्लांची वजनासह आरोग्य तपासणी सुरू
 संयोजकांकडून जय्यत तयारी

जालना - विविध आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात बुधवारपासून (ता.१९) कुस्तीपटूंची मांदियाळी जमण्यास सुरवात झाली आहे.

निमित्त आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे घेण्यात आलेली ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे. स्पर्धेनिमित्त गुरुवारपासून (ता.२०) कुस्तीची दंगल होणार आहे. 

शहरातील आझाद मैदान परिसरात भव्य असे स्पर्धास्थळ तयार करण्यात आले आहे. यात परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मैदानावर गादी व मातीचे दोन  विशेष आखाडे तयार करण्यात आले. मैदानावरील व्यवस्थेसाठी संयोजन समितीतर्फे उशिरापर्यंत मेहनत घेतली जात होती. दरम्यान, स्पर्धेनिमित्त बुधवारी ५७ व ७९ वजनी गटातील प्रत्येकी वीस मल्लांची वजन व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ४४ संघ शहरात दाखल झाल्याची माहिती संयोजन समितीचे सचिव डॉ. दयानंद भक्त यांनी दिली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री बबनराव लोणीकर, शेष महाराज गोंदीकर, भगवान महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.  

मल्लांची जंगी मिरवणूक 
कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने गुरुवारी (ता.२०)  बारा वाजता सहभागी झालेल्या सुमारे नऊशे  पहिलवानांची दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. राज्यमंत्री खोतकर यांच्या उपस्थितीत या फेरीचा प्रारंभ होणार आहे. शहरातील आझाद मैदानापासून फेरीला सुरवात होऊन शिवाजी पुतळा, सराफा मार्केट, फुल बाजार, सिंधी बाजार, मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, लोखंडी पूल, मंमादेवी मंदिर, गांधी चमनमार्गे संभाजी उद्यान येथे समारोप होणार आहे. या मिरवणुकीत राज्यासह देशभरातील अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींची उपस्थिती राहणार आहे.

 आझाद मैदानावर आज उद्‌घाटन सोहळा
 राज्यभरातून ४४ संघ दाखल
 मल्लांची वजनासह आरोग्य तपासणी सुरू
 संयोजकांकडून जय्यत तयारी

Web Title: wrestler in Jalna